Tuesday, July 14, 2015

तर्क विसंगत इंग्रजी भाषा - १९ डिसेंबर २०१४

त्रिकोन, चौकोन, पंचकोन, ....., बहुकोन या आकृत्यांच्या नावासाठी कोनांची संख्या हा एकच निकष ठेवून नावांत सातत्य, नादमाधुर्य राखण्याची दक्षता मराठीची जडणघडण करणाऱ्या विद्वानांनी घेतली.

हे सुदैव इंग्रजीच्या वाट्याला नाही. वरील शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द triangle, quadrilateral, pentagon, ......., polygon पहा. पहिले नाव कोनांच्या संख्येनुसार तर इतर नावे बाजूंच्या संख्येनुसार, पण बाजूंच्या संख्येनुसारच्या नावातही पहिले नाव इतर नावांपासून नादमाधुर्याच्या दृष्टीने विसंगत आहे.

बहुसंख्य विषयातील समान गुणधर्म असलेल्या बाबींसाठीच्या तथाकथित इंग्रजी शब्दांबाबत ( नामे, सर्वनामे ) अशाच विसंगती आढळतात. इंग्रजी शब्दांची मुळात जडणघडण झालीच नाही, केलीच नाही. हजारो भाषांमधून आयते शब्द चोरून ए ते झेड क्रमाने लिहायचे काम इंग्लंड मधील समुद्री चोर म्हणजे चाच्यांनी केले. समान गुणधर्म असलेल्या बाबींसाठीच्या तथाकथित इंग्रजी शब्दांची चोरी देखील एकाच भाषेतून केली नाही तर वेगवेगळ्या भाषांमधून केल्याने वरीलप्रमाणे विसंगती आढळतात. इंग्रजी ही प्रामुख्याने चोरांची मूळ भाषा असल्याने आणि चोरांच्या समुदायात विद्वानांची कमतरता असल्याने इंग्रजीच्या उगमापासून आजवर अनेक भाषांमधून शब्द्चोरी हाच इंग्रजांनी शब्द संग्रहासाठी वापरलेला प्रमुख पर्याय होता.
विचारपूर्वक जडणघडण झालेले, विद्वानांनी निर्माण केलेले मराठी शब्द असलेली, सुस्पष्ट व्याकरण नियमांनी बांधलेली मुक्त शब्दक्रमातील मराठी वाक्ये वाचून, लिहून शिक्षण घेणे, हा मानवी जीवनातील आनंददायी अमृतानुभव आहे. हा अनुभव मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना सहज आणि नियमित मिळतो.


सध्या ज्या भूभागाला इंग्लंड म्हणतात त्या भूभागातील चोरांनी अंदाधुंदपणे वेगवेगळ्या भाषेतून चोरलेले शब्द इंग्रजी शब्द मानून, त्यांच्या लेखन व उच्चारातील भयानक विसंगतींला नाईलाजाने तोंड देऊन, नियमापेक्षा अपवाद अधिक असणाऱ्या चमत्कारिक व्याकरणाशी झगडत ते शब्द एकमेकांशेजारी एकाच विशिष्ट क्रमात मुसक्या आवळून रांगेत उभे केलेली वाक्ये वाचून, लिहून शिक्षण घेणे हा मानवी जीवनातील एक यातनादायी अनुभव आहे. हा अनुभव इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना प्रचंड दडपणाखाली नियमित मिळतो.


आपल्या मुलांना कोणता अनुभव द्यायचा निर्णय शहाणे आणि सूज्ञ पालक घेतील ?
आता शाळा प्रवेशाचा हंगाम सुरु आहे. मुलांना इंग्रजी उत्तम यावे याची ओढ असली तरी ते उद्दिष्ट इंग्रजी माध्यमाच्या शाळेत साध्य होत नसून प्रगत, समृद्ध, संपन्न मराठी भाषा नीट शिकली तर मगच इंग्रजी बऱ्यापैकी येण्याची शक्यता आहे, हे पालकांनी समजून घ्यावे असे मी सुचवतो. इंग्रजी नीट यावी हे उद्दिष्ट सद्य होण्यासाठीही मराठी माध्यमाची शाळा निवडावी. मराठीचा नीट अभ्यास केला तर इंग्रजी देखील सुधारते, हा मुद्दा विसरू नये, असे आवाहन ! 


- अनिल गोरे, मराठीकाका.


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.