Saturday, July 18, 2015

बदलाचे स्वागत !


पुणे शहरातील अनेक मराठी माध्यम शाळांमधील प्रवेश संख्या वाढू लागली आहे. शहाण्या आणि सुज्ञ पालकांनी मुलांना मराठी माध्यमात घालण्याचा निर्णय घ्यायला सुरुवात केली त्याचे मी स्वागत करतो.
या बदलात सधन आणि उच्चशिक्षित पालकांचा सहभाग वाढत आहे हे चांगले लक्षण आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वीपर्यंत शाळेच्या माध्यमाची निवड खिशाकडे पाहून करायची पद्धत आढळत होती. भरपूर पैसे असतील तर इंग्रजी माध्यम निवडावे आणि पैसे पुरेसे नसतील अशा गरीबांनीच मराठी माध्यम निवडावे असा प्रघात होता. ही पद्धत अशास्त्रीय आणि दिशाभूल करणारी आहे अशी खात्री अनेक पालकांना अनुभवाने पटली.
कितीही पैसे ओतले तरी आपल्या मुलांचे इंग्रजी कच्चे राहते, इंग्रजी माध्यम शाळांमध्ये इंग्रजी व्याकरणाचे कौशल्य अविकसित राहते याची जाणीव झालेले पालक आता
" इंग्रजी सुधारण्यासाठी " का होईना, मराठी माध्यमाची निवड करत आहेत.
इंग्रजी सुधारण्यासाठी सर्वोत्तम ठरणारे ' मराठी मध्यम ' निवडल्यामुळे या पालकांच्या मुलांचे इतर विषय देखील मराठीच्या अनेक अंगभूत गुणांमुळे अधिक पक्के होतील हा त्यांना मिळणारा अतिरिक्त लाभ असेल.
मराठी माध्यमाकडे वळलेले हे पालक या चांगल्या निर्णयासोबत एक मोठी चूक करीत आहेत, ती त्यांनी टाळावी, असे मी आवाहन करतो. मराठी माध्यम स्वीकारताना गणित आणि विज्ञान विषयाचे आकलन तसेच अभिव्यक्तीत अडथळा आणणारा ' सेमी इंग्रजी ' हा घातक पर्याय निवडून हे पालक मुलांच्या विकासाची पूर्ण संधी मुलांना नाकारत आहेत, असे मला वाटते.
असो, नव्याने मराठी माध्यमाकडे वळणारा श्रीमंत किंवा धनाढ्य वर्ग अजूनही दोन विषयांसाठी इंग्रजीवर जीव लावून आहे पण येत्या काही वर्षात सेमी इंग्रजी या घातक पर्यायाने होणारे नुकसान लक्षात घेऊन हा वर्गदेखील सेमी इंग्रजी नसलेल्या पूर्ण मराठी माध्यम वर्गांची आणि शाळांची निवड करेल अशी माझी खात्री आहे.
- अनिल गोरे, मराठीकाका

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.