Saturday, July 18, 2015

उपयुक्त मराठी

मराठी ही जगातील पहिली नागरी भाषा असावी असा माझा एक दावा असून भाषिक कौशल्याचा पाया भक्कम करण्यासाठी मुलभूत भाषा म्हणून जगातील कोणालाही मराठीचा उत्तम अभ्यास उपयुक्त ठरेल. या अर्थाने मराठी ही जगातील सर्वोत्तम भाषा असल्याने इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेचे कौशल्य हवे असेल अशा मुलांना लहानपणी मराठी माध्यमातून शिकवावे हा माझा सल्ला जगभरासाठी अतिशय योग्य आहे असे दाखवणारा पुढील ब्रिटीश काउन्सिलने प्रसिद्ध केलेल्या अहवालातील मुद्दे पहा.
अहवालातील माहिती - इतर भाषेच्या मुलांच्या तुलनेत मराठमोळ्या मुलांचे इंग्रजी उत्तम आहे. दुसरा क्रमांक मल्ल्याळी मुलांचा लागतो. इंग्रजीवर प्राविण्य सिद्ध करण्यासाठी टॉफेलसारख्या परीक्षा आयोजित करणारी इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम (IELTS) च्या माध्यमातून ब्रिटीश काउन्सिलने हा निष्कर्ष मांडला आहे. इंग्रजी बोलणाऱ्या सर्व देशात IELTS ने ही परीक्षा घेतली.
- २०१३ मध्ये जागतिक पातळीवर घेतलेल्या चाचणीतील ह्र निष्कर्ष मराठी भाषकांसाठी प्रेरणादायक आहेत. मराठी भाषा आणि मराठी भाषक जगाचे भाषिक नेतृत्व करू शकतील. ( इति - अनिल गोरे, मराठीकाका )

अहवालातील माहिती - मातृभाषा मराठी असलेले विद्यार्थी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणाऱ्यांध्ये पहिल्या स्थानावर, त्यानंतर मल्ल्याळी, तमिळ, हिंदी, पंजाबी मुलांचा क्रमांक लागतो. IELTS ने इंग्रजी लेखन, वाचन, बोलणं आणि ऐकणं अशा चार पातळ्यांवर परीक्षा घेतली. इतर देशातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांनी इंग्रजीवर चांगलेच प्राविण्य मिळवले आहे, अशी माहिती ब्रिटीश काउन्सिलचे भारतातील परीक्षांचे संचालक सराह देवेराल यांनी सांगितलं.
- इंग्लंड, अमेरिकेसह सर्व देशातील ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगले समजावे, इंग्रजीतून चांगले लिहिता, वाचता, बोलता यावे असे त्यांना आणि त्यांच्या पालकांना वाटत असेल तर पहिली भाषा म्हणून मराठी शिकावी आणि मराठीच्या माध्यमातून इंग्रजी तसेच अन्य भाषा शिकाव्यात.मराठी ही आई आहे आणि इंग्रजी ही मावशी आहे असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर आपण लक्षात घेतले पाहिजे की, आई असेल तरच मावशी असते. आईशिवाय मावशी अस्तित्वातच येऊ शकत नाही. (इति -अनिल गोरे, मराठीकाका )
असो, महाराष्ट्रातील नवतरुण पालकांनो उगाच इंग्रजी माध्यम शाळा या विषाची परीक्षा घेत बसू नका. आपल्या मुलांसाठी मराठी माध्यमाची शाळा निवडा, सेमी इंग्रजीचा खुळचट पर्याय टाळा आणि इंग्रजीसह सर्व विषयांत उत्तम प्राविण्य मिळवण्याची सुसंधी आपल्या लाडक्या मुलामुलींना मिळवून द्या ! मुलांचे हित हे इंग्रजी माध्यमात घालण्य्साठी दिल्या जाणाऱ्या शेजारपाजारच्यांच्या अर्धवट, अशास्त्रीय सल्ल्यापेक्षा मोलाचे असते, याचे भान सोडू नका.
यापूर्वी आपली मुले इंग्रजी माध्यमात किंवा सेमी इंग्रजीत घातलेल्या पालकांनी तर आपली चूक सुधारण्यासाठी विशेष कृती करण्याची आवश्यकता आहे. माध्यम तातडीने बदलून मराठी माध्यम निवडा. यशाचे आकाश तुमच्या मुलाची वाट पाहत आहे. चला आज काही वादळी ( तुफानी ) करू या ! - अनिल गोरे, मराठीकाका

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.