Saturday, July 18, 2015

उच्च शिक्षणात मराठी

पुढील सूचना/ बातमी/ निवेदन दैनिक, साप्ताहिक, मासिक, पाक्षिकात लेख, चौकट, स्फुट किंवा चित्रवाणी, मुलाखती, सूचनाफलक, सार्वजनिक फलक, भाषण, संगणक, भ्रमणध्वनीद्वारे कार्यालय, वस्ती, संस्था,मंडळ अशा ठिकाणी संधी मिळताच तोंडी चर्चा व सुचेल त्या मार्गाने लाखोंना पोचवावी हे आवाहन ! 
मराठीतील कमी अक्षरी शब्द, कमी शब्दांची वाक्ये, कार्यकारणभावानुसार शब्दनिर्मिती, वाक्यातील लवचीक शब्दक्रम या वैशिष्ट्यांमुळे शालेय शिक्षण आणि विज्ञान, तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, उद्योग, संवाद, सामाजिक शास्त्रे, प्रशासन, संज्ञापनसह सर्व क्षेत्रातील उच्चशिक्षण, प्रशिक्षण, अहवाल, सर्वेक्षण, दैनंदिन कामकाजासाठी सध्या मराठी जगभर वापरात नाही हे खरे असले तरी गुणवत्तेचा आणि मराठीतील भाषिक सोयींचा विचार करता मराठी जगातील सर्वोत्तम भाषामाध्यम आहे. जगात आणि त्यापूर्वी भारतात सर्वत्र उच्चशिक्षणात मराठी माध्यम उपलब्ध असावे, पूर्वतयारी म्हणून ११, १२ वीला भौतिक, गणित, रसायन, जीवशास्त्र, भूशास्त्र, संगणक मराठीतून शिकवावे, ही मागणी २००८ मध्ये मी सर्व मुख्यमंत्र्यांकडे केली. प्रतिसाद चांगला असून गोवा, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, उत्तराखंड, पंजाब, गुजरात राज्यांनी मागणी तत्वत: मान्य केली. जून २०१६ ला तिथे मराठीतून ११, १२ वीला विज्ञान शिकवणे सुरु होईल. 
गुजरातचे माजी मुख्यमंत्री सध्याचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदींनी लाख घातल्याने २०१३ – १४ पासून सुरत, बडोदा, वलसाडच्या गुजरातमधील विद्यार्थ्यांना काही वर्गांत ११, १२ वीचे भौतिक, रसायन, गणित, जीवशास्त्रविषय मराठीतून शिकवतात. गुजरातमध्ये जगातील सर्वोत्तम गोष्टी असाव्या म्हणून विज्ञान शाखा मराठी माध्यम गुजरातमध्ये सुरु झाले. पूर्वी हे विषय इंग्रजीतून शिकवणाऱ्या महाराष्ट्रातील मराठी भाषक (एम. एस्सी) शिक्षकांना गुजरातमध्ये ‘ शास्त्री ‘ (तिथे प्राध्यापकांना शास्त्री म्हणतात) नेमून मराठीतून शिकवणारे वर्ग सुरु झाले. हे विषय इंग्रजीपेक्षा मराठीतून अधिक सखोल, व्यापक समजतात असा अनुभव गुजरातच्या विद्यार्थ्यांना आल्याने जून २०१५ पासून मराठी माध्यम विज्ञानाचे आणखी वर्ग तिथे सुरु होतील. सध्या संस्कृतमधील अतिउच्च शिक्षण जर्मनीत मिळते त्याप्रमाणे १० वी नंतरचे विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक, जैविक शास्त्रे उच्चशिक्षण मराठी या जगातील सर्वोत्तम भाषेतून द्यावे अशी मागणी मी जर्मन विद्यापीठांसह अन्य परदेशी विद्यापीठांकडे केली. हायडेलबर्ग विद्यापीठ, जर्मनी येथे येत्या काही वर्षांत कदाचित या आधुनिक विद्याशाखांसह अन्य विद्याशाखांचे मराठी माध्यमातील वर्ग सुरु होऊ शकतील. 
विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नातील बारकावा चांगला समजतो आणि ते स्वत: विचार करून अधिक अचूक उत्तर देऊ शकतात. कोणत्याही अखिल भारतीय परीक्षेत मराठी प्रश्नपत्रिका दिल्यास संबंधित आस्थापनेला महाराष्ट्रातील अधिक कुशल उमेदवार मिळू शकतील हे मी केंद्र सरकारला २०११ मध्ये पटवून दिल्याने एप्रिल २०१४ पासून भारतीय प्रौद्योगिकी संस्थान प्रवेश परीक्षा ( IIT – JEE ) प्रश्नपत्रिका मागणीनुसार दरवर्षी मराठीत मिळू लागली. माझ्या इतर मागणीनुसार BANK RECRUITMENT, UPSC, RAILWAY आणि अन्य अखिल भारतीय परीक्षांत मराठी व अन्य प्रादेशिक भाषेत प्रश्नपत्रिका आणि उत्तरे देण्याची मुभा देऊन केंद्र सरकारने इंग्रजीचे अनावश्यक अवडंबरही अलीकडे कमी केले. 
११, १२ वीला भौतिक, रसायन, गणित, जीवशास्त्र इ. विषय मराठीतून शिकण्याची इच्छा महाराष्ट्रात अनेक विद्यार्थ्यांना आहे. या विषयांची ११ , १२ वीची मराठी भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत, या विषयांची १२ वीची परीक्षा महाराष्ट्र सरकार मराठीतून घेते. भौतिक, रसायन, गणित, जीवशास्त्र इ. विषय ११ वी, १२ वीच्या वर्गात मराठीतून शिकवण्याची सोय १९७५ ते १९८० पर्यंत महाराष्ट्रात होती. टी सोय पुन्हा सुरु करावी, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी आणि मी महाराष्ट्र शासनाकडे २०१० पासून करूनही शासनाने ११, १२ वी विज्ञान शाखेत मराठीतून शिकवण्याची व्यवस्था महाराष्ट्रात कोठेही केली नाही. अद्याप त्यासाठी सर्वेक्षण किंवा इतर प्राथमिक कार्यवाही देखील केलेली नाही. ज्यांना ११, १२ वी विज्ञान शाखेत भौतिक, रसायन, गणित, जीवशास्त्र इ. विषय मराठीतून शिकण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांना आता ही सोय गुजरात सरकारने उपलब्ध केली त्याबाबत गुजरात सरकारचे सर्व महाराष्ट्रीय, मराठी भाषकांनी आभार मानले पाहिजेत. हे पत्रक वाचणाऱ्या कोणाच्या शाळेत, शिकवणी वर्गात, भजनी मंडळात, महाविद्यालयात, गृहरचना संस्थेत, कार्यालयात, संघटनेत, मंडळात, सत्संगात, भिशीत, महिला मंडळात ११ वी, १२ वी विज्ञान शाखेचा अभ्यास मराठीतून करण्याची इच्छा असलेले विद्यार्थी किंवा त्यांचे पालक असू शकतील. ११, १२ वी हे विज्ञान शाखेत मराठीतून शिकण्याची व्यवस्था महाराष्ट्रात नसली आणि लवकर होण्याची शक्यता तरी अशी व्यवस्था गुजरात राज्यांत सध्या आहे आणि पुढच्या वर्षीपासून भारतातील आणखी दहा राज्यांत तसेच काही वर्षांनी जर्मनीत ही सोय उपलब्ध होईल हे त्यांना अवश्य सांगावे, आवश्यकता भासल्यास त्यांना अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क साधायला सांगावे. महाराष्ट्रात ११, १२ वी विज्ञान - मराठी माध्यम सुरु होई पर्यंत महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांना जगातील सर्वोत्तम भाषामाध्यमातून उत्तम, दर्जेदार विज्ञान शिक्षणाची संधी मिळावी यासाठी वरील माहितीचा प्रसार सर्वांनी स्वत:चे कार्य समजून करावा, हे सर्वांना कळकळीचे आवाहन ! 
कळावे, आपला विश्वासू, 
प्रा. अनिल गोरे ( मराठीकाका ) अ- ११२ बाळाजी प्रासाद, दक्षिणमुखी मारुती शेजारी, अप्पा बळवंत चौकाजवळ, ४७१ शनिवार पेठ पुणे ४११०३०. 
भ्रमणध्वनी ९४२२००१६७१ वी – पत्ता marathikaka@gmail.com

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.