Saturday, July 18, 2015

इतरांचे जगणे अधिक सोपे करण्याचा निर्धार !


महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ गावातील माधव सेवा संघ या संस्थेच्या सभागृहात दि. २४ / ०५ / २०१५ या दिवशी माझे सव्वा तासाचे व्याख्यान झाले. " इंग्रजी नावाच्या वेळखाऊ, मानवी स्वभावाशी विसंगत भाषेतून जीवनातील बहुसंख्य व्यवहार करण्याऐवजी तेच व्यवहार मराठी या जगातील पहिल्या नागरी भाषेतून केले तर वेळ वाचतो, आशय कमी कष्टात समजावून घेणे आणि अधिक काळ लक्षात राहणे अधिक सोपे होते, लिखाणाचे कष्ट कमी होतात आणि त्यामुळे एकूण आयुष्याची कार्यक्षमता वाढते " हे माझे बोलणे अनेक श्रोत्यांना पटले.
ज्यांच्या घरातील मुले इंग्रजी माध्यम शाळेत आहेत अशा अनेक श्रोत्यांनी आपल्या घरातील मुले ज्या इयत्तेत आहेत त्या इयत्तेची आणि त्यापूर्वीच्या सर्व इयत्तांची मराठी माध्यमाची पुस्तके घरी आणून सर्व विषयांचा समांतर अभ्यास मराठीतून करून घेण्याचा विचार बोलून दाखवला. उपस्थित सर्वांनी यापुढे आपले धनादेश मराठी या वेगवान भाषेतून, कमी अक्षरांत लिहिण्याचा आणि मिळणारे धनादेश मराठीतून मागण्याचा संकल्प सोडला.
मराठीतून धनादेश लिहिल्याने अक्षरी रकमेसाठी रोमन लिपीतील इंग्रजी मजकुराच्या तुलनेत ७० % कमी अक्षरे लिहावी लागतात. एका धनादेशाचा वापर होताना अक्षरी रक्कम तीनवेळा लिहिली जाते आणि आठवेळा वाचली जाते. मराठीचा वापर केल्याने होणारी वेळेची बचत ही काळाची गरज असून त्यामुळे धनादेश देणारा, घेणारा आणि अधिकोशातील तसेच अन्य कर्मचारी यांचा प्रचंड वेळ वाचेल.
असो, भारतातील कोणताही अधिकोष ( बँक ) मराठीतील धनादेश नाकारण्याची भूमिका घेत नाही पण एखादा अडाणी / अज्ञानी अधिकारी मराठी लिखाणाबाबत नापसंती दर्शवू शकेल. असा एखादा अडाणी / अज्ञानी अधिकारी कोठे समोर आला तर मात्र कृपया मला कळवावे. आपण त्याचे विविध मार्गांनी साकारी नियम दाखवून प्रबोधन करू ! - अनिल गोरे, मराठीकाका.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.