Saturday, July 18, 2015

तर्क विसंगत इंग्रजी

इंग्लंडमध्ये इ.स. १७१० मध्ये समुद्री चोर [ चाचे ] हट्टाला पेटले आणि त्यांनी इंग्रजी या मागासलेल्या भाषेतून सर्व विषय शिकवणारी एक शाळा सुरु केली. या शाळेत शिकणारा पहिला मुलगा कोणताही विषय नीट समजत नसल्याने वैतागून गेला. एके दिवशी तो निराश मनोवस्थेत जंगलात गेला. तिथे त्याला एक जुनापुराणा दिवा सापडला. तो दिवा स्वच्छ करावा म्हणून त्याने घासणीने घासायला सुरुवात केली तेव्हा त्यातून एक राक्षस बाहेर पडला.
राक्षस त्या मुलाला म्हणाला की, " मला कोणतेही आणि कितीही अवघड काम सांग. मी ते करीन पण मी कामाशिवाय एक तास रिकामा राहिलो तर तुला खाऊन टाकीन. " मुलाने राक्षसाला अनेक कामे सांगितली जी राक्षसाने लगेच केली. संध्याकाळी तो मुलगा राक्षसाला घेऊन समुद्रकिनारी गेला आणि त्याला लाटा मोजायला सांगितल्या. थोडा वेळ लाटा मोजून राक्षसाने समुद्राच्या लाटाच थांबवल्या आणि मोजलेला आकडा मुलाला सांगितला. आता रात्र व्हायला आली. आपण झोपल्यावर राक्षस एक तासाहून अधिक काळ कामाशिवाय रिकामा राहील आणि आपल्याला खाईल अशी त्या मुलाला भिती वाटू लागली. मन स्थिर असले की, संकटातही मार्ग सापडतो तसा त्या मुलाला आपल्या शाळेतील स्वानुभवातून एक मार्ग सापडला.
त्याने राक्षसाला एक नवीन काम सांगितले, ते काम म्हणजे " इंग्रजीवर प्रभुत्व मिळव "
तो मुलगा म्हातारा होऊन त्याचे देहावसान झाले पण राक्षस त्याने सांगितलेल्या कामात कायमचा गुंतला. राक्षस सर्व प्रयत्न करून थकला. त्याने शेकडो शब्दकोश पाठ केले, तीन हजार वेळा स्पोकन इंग्रजीची शिकवणी लावली. इंग्रजी शिकण्यासाठी २४ तासात २४ वेगवेगळ्या देशात जाऊन एक एक तासाच्या २४ शिकवण्या लावून इंग्रजी शिकायचा प्रयत्न काही वर्षे केला. ब्रिटिश कौन्सिलचे सभासदत्व घेतले, तरी भागेना ! तो गुजरातमध्ये, फ्रान्समध्ये, कोरियात देखील काही दिवस राहिला. जाता येता इतर भाषा सहज कानावर पडून त्याचे इतर अनेक भाषांवर प्रभुत्व निर्माण झाले, पण त्या लहान मुलाने सांगितलेले "इंग्रजीवर प्रभुत्व मिळव " हे काम पुरे झाल्याची भावना त्याच्या मनात कधीही निर्माण झाली नाही. शेवटी हताश होऊन त्याने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचे कर्मकठीण काम ठेका पद्धतीने कोणाला तरी द्यायचे ठरवले. जगातील इतर कोणतीही गोष्ट शक्य असणाऱ्या राक्षसाला खूप काल हा ठेका घ्यायला ठेकेदार मिळेना. एकदा तो सहज महाराष्ट्रात आला आणि आश्चर्य घडले. स्वभाषेला दुय्यम, तिय्यम स्थान देऊन इंग्रजीवरील प्रभुत्वाचा हा ठेका घेणारे लोक त्याला अखेर इथे सापडले. महाराष्ट्रातील काही मराठी माणसांना त्याने या कामाचा ठेका दिला. गेली दोनशे वर्षे लाखो मराठी लोक या राक्षसाने दिलेला ठेका घेऊन इमाने इतबारे प्रयत्न करत आहेत. इंग्रजीच्या मूळ मागासलेपणामुळे आपले अख्खे आयुष्य इंग्रजीला वाहिले तरी इंग्रजीवर प्रभुत्व असल्याची स्वत:पुरती तरी खात्री वाटणारा माईचा लाल अजून महाराष्ट्रात आणि जगात कोठेही आढळत नाही.
गेली दोनशे वर्षे मराठी माणसे इंग्रजीच्या व्यसनात गुंगली आहेत आणि तो राक्षस इंग्लंडमधील एका रम्य समुद्रकिनारी निवांत मजेत पहुडला आहे. तो सहसा कोणाला दिसत नाही, पण ज्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असेल त्यालाच तो दिसतो, म्हणे !
त्या राक्षसाचे जगणे असह्य करणाऱ्या त्या लहान मुलाशिवाय जगातील कोणीही त्याला अद्याप पाहिलेले नाही. कोणाला दिसला तर अवश्य कळवा. - अनिल गोरे, मराठीकाका

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.