Saturday, July 18, 2015

मराठी माध्यमाचा झेंडा दरवर्षीप्रमाणे अधिक उंच फडकला !


महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकारी पदांसाठी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या १,७६,२२४ उमेदवारांपैकी ४३८ यशस्वी झाले आणि त्यातील ४२५ जण १ ली ते १० वी पर्यंत मराठी माध्यम शाळांमध्ये शिकले आहेत.
सुमारे १५ ते १८ वर्षांपूर्वी खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनांपायी पुणे - मुंबईतील पालक आपल्या मुलांची इंग्रजी माध्यमात खोगीर भरती करीत असताना या ४२५ यशस्वी उमेदवारांच्या पालकांना आर्थिक परिस्थिती किंवा इंग्रजी माध्यमासारखे घातक भाषिक माध्यम इतरत्र उपलब्ध नसल्याने मुलांना इंग्रजी माध्यमात घालताच आले नव्हते. या मुलांचे नशीब चांगले म्हणून ही मुले इंग्रजी माध्यमाच्या जाळ्यात अडकली नाहीत. मराठीच्या अंगभूत गुणांमुळे त्यांना शिकलेले सर्व विषय शाळेत शिकत असतानाच बऱ्यापैकी समजले आणि विशेष म्हणजे त्यांना इंग्रजीची चांगली जाणही आली. महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण कामकाज मराठीतून करण्याचा अधिनियम असूनही महाराष्ट्र शासनाचे अधिकारी निवडण्यासाठीच्या पात्रता परीक्षेत इंग्रजीला अनावश्यक आणि अतिरेकी महत्व देण्याचा चाळा अनेक वर्षे महाराष्ट्र लोकसेवा आयोग नावाची संस्था करीत असते. मराठी माध्यमाचे विद्यार्थी या चाळ्यांनाही पुरून उरतात. १ ली ते १० वी मराठी माध्यमात शिकलेल्या वरील यशस्वी उमेदवारांना इंग्रजी व्याकरणाचे बारकावे १ ली ते १०वि इंग्रजी माध्यमात शिकलेल्या उमेदवारांपेक्षा अधिक चांगले माहीत असल्याने त्यांना इंग्रजी वाचन अधिक चांगल्या प्रकारे करता आले. इंग्रजी भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेला अधिक महत्व आणि इंग्रजीतून मुलाखती अशा राज्य आयोगाच्या आगाऊ आणि अशास्त्रीय चाळ्यांनाही यशस्वीपणे तोंड देता आले आणि लक्षणीय यश मिळाले.
असो, उत्तम शिक्षण आणि इंग्रजीची उत्तम जाण ( हा उद्देश असलेल्यांनी ) या दोन उद्दिष्टांसाठी नवतरुण पालकांनी,
" इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, इंग्रजी माध्यमातून शिकल्याने जगात कोठेही अडणार नाही"
असल्या भाकडकथा बाजूला ठेवून घराजवळ असलेल्या मराठी माध्यम शाळेची निवड मुलांसाठी करावी. खरेतर आपल्या कोवळ्या, लहान मुलांसाठी सुरुवातीचे शैक्षणिक भाषा माध्यम म्हणून इंग्रजी माध्यम निवडले तर ENGINEERING, MEDICAL, COMP. SCIENCE, UPSC, MPSC, NDA, BANK RECRUITMENT, MILITARY RECRUITMENT आणि अन्य अनेक स्पर्धा परीक्षांत मोठे यश मिळायला फारच अडचण येते याचा अनुभव असंख्य मराठी पालकांना आला आहे पण सामाजिक दबावामुळे असे बहुसंख्य पालक आपला हा अपयशाचा अनुभव मोकळेपणाने सांगत नाहीत म्हणून मला त्याचा वेध घेऊन संबंधित माहिती लोकांसमोर ठेवावी लागत आहे.
केवळ इंग्रजी शाळांचा धंदा चालावा यासाठी हातभार म्हणून हजारो, लाखो रुपये त्यांना देण्यापेक्षा आता नवतरुण पालकांनी वेगळा विचार करावा असे मी सुचवतो. ज्यांना इंग्रजी माध्यम शाळांना भरपूर पैसे द्यायचे आहेत, त्यांनी त्यासाठी अशा शाळांना देणग्या द्याव्यात पण आपले मूल मात्र त्यांच्या ताब्यात देऊ नये कारण मुलांना इंग्रजी माध्यमात घातल्यावर मुलांना मोठे यश मिळाल्याचे समाधान क्वचितच वाट्याला येणार आहे. यावर हाच उत्तम उपाय आहे की, मोठ्या यशासाठी मुलांना मराठी माध्यमात घालावे आणि इंग्रजीवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना उदारपणे देणग्या द्याव्यात. देणगी दिलेली रक्कम आपण नंतर पुन्हा मिळवू शकतो पण इंग्रजी माध्यम शाळेत घालून बिघडलेले इंग्रजी व्याकरण किंवा विज्ञान, इतिहास, भूगोल, गणित विषयांतील अपेक्षेपेक्षा अपुरे कौशल्य मात्र नंतर पुन्हा सुधारू शकत नाही. मागील पिढीने भावनेच्या भरात ज्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातले त्यांनी केलेल्या चुकीचे परिणाम भोगलेले अनेक नवतरुण पालक सध्या मुले शाळेत घालण्याच्या वयात आहेत. आपल्या मागील पिढीच्या चुकीची जाणीव झालेले अनेक नवतरुण पालक मराठी माध्यमाकडे अधिक डोळसपणे पाहत आहेत आणि मराठी माध्यमाची निवड आपल्या मुलांसाठी करीत आहेत.
प्रगतीच्या, यशाच्या दिशेने नेणारा मराठी माध्यम निवडीचा हा प्रवाह अधिक मोठा व्हावा म्हणून सर्व मराठीप्रेमींनी आपल्या मित्र, नातेवाईकांचे सुयोग्य प्रबोधन करावे आणि प्रगत, समृद्ध, संपन्न मराठी भाषेतून शिकण्याची दुर्मीळ सुसंधी सर्व पात्र चिमुकल्यांना मिळवून द्यावी, ज्यांनी यापूर्वी ही सुसंधी न साधता इंग्रजी माध्यम निवडले आहे त्यांनाही सावध करावे आणि इ. १० वीच्या अगोदर शक्य तितक्या लवकर माध्यम बदलून मराठी माध्यमाकडे वळण्यासाठी प्रबोधन करावे असे आवाहन ! - अनिल गोरे, मराठीकाका

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.