Saturday, July 18, 2015

इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ वाढवून देणेबाबत

मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा तसेच त्यांच्या सहसा वापरल्या जाणाऱ्या लिप्या यात जमीन अस्मानाचा फरक असल्याने ज्या विद्यार्थ्यांच्या दुर्दैवामुळे त्यांच्या आईबाबांनी त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यम निवडले त्यांना थोडा दिलासा देणारी एक मागणी मी काल केली आहे. इंग्रजी माध्यमात शिकत असलेल्या मुलांच्या अधिकाधिक पालकांनी या मागणीची राज्य परीक्षा मंडळाकडे पुष्टी करावी, असे मी सुचवतो. मागणीची प्रत पुढे आहे.
प्रति- मा. अध्यक्ष, 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, 
शिवाजीनगर, पुणे
विषय : इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ वाढवून देणेबाबत.
महोदय,
आपल्या मंडळाकडून इ. १० वी, १२ वीसाठी विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जातात. यासाठी मराठी, हिंदी, कन्नड, उर्दू, सिंधी, गुजराती, इंग्रजी इ. विविध भाषामाध्यमात आपले मंडळ प्रश्नपत्रिका काढते आणि विद्यार्थी यापैकी कोणत्याही एका माध्यमातून एखादी उत्तरपत्रिका लिहू शकतात. भारतीय लिपीतील, भारतीय भाषांतील मजकुराच्या रोमन लिपीतील संगत ( corresponding ) इंग्रजी मजकुरात अधिक शब्द, अधिक अक्षरे लिहावी, वाचावी, बोलावी, पाठ करावी लागतात.
इंग्रजी भाषा, रोमन लिपी आणि इंग्रजी व्याकरणात असलेल्या भयानक आणि विचित्र विसंगती, त्रुटी सांभाळत इंग्रजीतून उत्तरे लिहिणे अतिशय कष्टाचे, जिकिरीचे काम आहे. आपल्या मंडळाकडून १० वी, १२ वी परीक्षेतील परीक्षार्थींना विविध विषयांच्या उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी मराठी, हिंदी, कन्नड, उर्दू, सिंधी, गुजराती भाषामाध्यमातील विद्यार्थ्यांना दिलेला वेळ त्यांना जेमतेम पुरतो, पण त्याच विषयांच्या त्याच परीक्षेतील उत्तरपत्रिका रोमन लिपीतील इंग्रजीतून पूर्णपणे लिहिण्यास तो वेळ पुरेसा नाही. भारतीय लिप्यांतून भारतीय भाषांतून काढलेल्या भाषेतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील शब्दसंख्येपेक्षा रोमन लिपीतील संगत इंग्रजी प्रश्नपत्रिकेत ३० % ते ७० % अधिक शब्द आणि ७० % ते ३०० % अधिक अक्षरे असतात. भाषेतर विषयांच्या भारतीय भाषांतून लिहिलेल्या आदर्श उत्तर पत्रिकेतील शब्दसंख्येपेक्षा रोमन लिपीआणि इंग्रजी भाषेतून लिहावयाच्या उत्तरपत्रिकेत ३० % ते ७० % अधिक शब्द आणि ७० % ते ३०० % अधिक अक्षरे लिहिणे आवश्यक असते. इंग्रजी उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी प्रचंड प्रमाणात अधिक अक्षरे लिहिणे भाग पडत असल्याने इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना आपण दिलेला वेळ नेहेमी अपुरा पडतो. हा अन्याय दूर होण्यासाठी मी पुढील मागणी आपल्याकडे करीत असून तिचा गंभीरपणे विचार करावा, ही विनंती !
वरील भेद लक्षात घेता मराठी, हिंदी, कन्नड, उर्दू, सिंधी, गुजराती इ. भाषामाध्यमातील विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी जितका वेळ दिला जातो त्यापेक्षा किमान दुप्पट ते कमाल तिप्पट वेळ इंग्रजीतून भाषेतर विषयांच्या उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा वेळापत्रकात अधिकृतपणे दिला जावा अशी मी आपल्याकडे मागणी करीत आहे. कृपया याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, आणि याबाबत घेतलेला निर्णय आवेदनकर्ता या नात्याने मला कार्यालयीन कामकाजानुसार उत्तर देण्याच्या विहित मुदतीत पत्रोत्तराने कळवावा ही विनंती !
आपला विश्वासू,
प्रा. अनिल गोरे –
अ ११२, बाळाजी प्रसाद, ४७१ शनिवार पेठ, पुणे ४११०३०.
संपर्क ९४२२००१६७१, marathikaka@gmail.com

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.