Saturday, July 18, 2015

वर्धा जिल्ह्यात विशेष माध्यमांतर !


स्वत:कडे शिक्षक पदासाठी आवश्यक पूर्ण पात्रता आणि शिक्षणशास्त्रातील आवश्यक प्रशिक्षण, पदवी असे असतानाही स्वत:च्या शाळेवर आणि एक प्रकारे स्वत:वर अविश्वास दाखवून महापालिका, जिल्हा परिषदा तसेच महाराष्ट्रातील असंख्य खाजगी अनुदानित शाळांमधील उत्तमोत्तम शिक्षकांनी पूर्वी एक मोठी चूक केली होती.
या शिक्षकांनी आपली स्वत:ची मुले मात्र अपुरे शिक्षण असलेल्या आणि प्रशिक्षण मुळीच मिळत नसलेल्या शिक्षकांच्या जीवावर चालणाऱ्या पण ' इंग्रजी माध्यम ' अशी चकचकीतपाटी लावलेल्या शाळांमध्ये ( ज्यातील बहुसंख्य NON TEACHING EDUCATIONAL INSTITUTE आहेत. ) घातली होती. अशा अनेक शिक्षकांना अपेक्षाभंगाचे दु:ख वाट्याला आले. हे शिक्षक ज्या शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिकवतात त्या शाळेतील मुले मोठमोठ्या परीक्षांमध्ये यशस्वी होऊन पेढे द्यायला येत असताना आपली स्वत:ची मुले मात्र अतिशय तोकडे, अपुरे यश मिळवताना पाहून अशा अनेक शिक्षकांच्या मनाला खूप यातना झाल्या. पण याने केले, त्याने केले म्हणून प्रवाहपतित मनोवृत्तीने अशा अनेक शिक्षकांनी आपल्याही मुलांना कमी शिकलेल्या, चुकीचे पण भराभर इंग्रजी बोलणाऱ्या शिक्षकांच्या हाती सोपवले होते.
या शिक्षकांनीच स्वत:च्या शाळेवर आणि स्वत:वर अविश्वास दाखवल्याने इतर समाज देखील ' इंग्रजी माध्यम ' अशी चकचकीत पाटी लावलेल्या शाळांच्या ( ज्यातील बहुसंख्य NON TEACHING EDUCATIONAL INSTITUTE आहेत. ) नादी लागला आणि गेल्या २५ वर्षात महाराष्ट्राची किमान आणि कमाल अशा शैक्षणिक गुणवत्तेत कमालीची घसरण झाली. या घसरणीला मराठी माध्यम शाळांचा घसरता दर्जा कारणीभूत आहे अशी अफवा काही स्वयंसेवी संस्थांनी पसरवली आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे एकूण समाजानेच मराठी माध्यमाकडे पाठ फिरवली.
२५ वर्षांपूर्वी मराठी माध्यमाच्या शिक्षकांनी केलेल्या या भयानक चुकीमुळे त्यांच्या मुलांची अपेक्षित प्रगती तर झाली नाहीच शिवाय त्यांच्या स्वत:च्या शाळा बंद पडण्याची वेळ आली. या शाळा वाचवण्याचा विचार मनात ठेवून अत्यंत नाईलाजाने वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील काही शिक्षकांनी आपली मुले विविध NON TEACHING EDUCATIONAL INSTITUTE म्हणजे convent शाळांमधून काढून आपापल्या मराठी माध्यमाच्या शाळेत घातली आहेत.
या शिक्षकांनी हे काम केवळ स्वत:ची नोकरी वाचविण्यासाठी केले असले तरी त्यांनी नकळत आपल्या मुलाचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याची कृती केली आहे. यापुढे त्यांच्या मुलांचा इंग्रजी भाषा हा विषय सुधारेल, गणित आणि विज्ञानातील कल्पना मराठीतून नीट समजतील. अनेक वर्षे मराठीतून उत्तम शिकवल्याने आपल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या यशानंतर पेढे खाणाऱ्या पण त्याचवेळी आपल्या स्वत:च्या मुलांच्या जेमतेम काठावरील यशाने हिरमुसलेल्या या शिक्षकांना पुढील काळात आपल्या स्वत:च्या मुलांच्या मोठ्या यशानिमित्त पेढे वाटण्याची संधी मिळेल. इंग्रजीच्या स्पर्शाने झालेले मुलांचे नुकसान आता मराठी माध्यमातील उत्तम वातावरणाने भरून निघेल.
या शिक्षकांचे अनुकरण सर्वच शिक्षकांनी करावे तसेच सर्व पालकांनी करावे असे आवाहन !
या ! सर्वोत्तम अशा मराठी माध्यमात प्रवेश घ्या ! आज इंग्रजी माध्यमात शिकत असलेल्यांचे माध्यम बदल आणि प्रगत, समृद्ध, संपन्न मराठी माध्यमातून उरलेले शालेय शिक्षण घ्या, हे कळकळीचे आवाहन ! - अनिल गोरे, मराठीकाका

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.