Saturday, July 18, 2015

इंग्रजी घातक रोग

महोदय,
जोपर्यंत महाराष्ट्रात १९७५ पूर्वी बहुतेक सर्व शाळा मराठी माध्यमाच्या होत्या आणि सर्व भाषेतर विषय केवळ मराठी या एकाच प्रगत, संपन्न, समृद्ध भाषेतून आणि वैभवी देवनागरी लिपीच्या सहाय्याने शिकवले जात तोपर्यंत मुले शिकत होती आणि शिक्षक शिकवू शकत होते.
इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्यापासून आणि मराठी माध्यम शाळेत सेमी इंग्रजी नावाच्या घातक रोगाची लागण झाल्यापासून शिक्षकांना शिकवणे जमेना. बरेच निव्वळ फळ्याजवळ ऊभे राहू लागले, शिकवता येईना म्हणून पायताणे, जोडे, कपडे, कंठलंगोट, नखे, केस हे सर्व ठीक आहे की नाही याची तपासणी करण्यात वेळ घालवू लागले. पुस्तकात प्रश्नोत्तराच्या खुणा करून देऊन आपली जबाबदारी झटकू लागले. मुलांचे हात लिहून लिहून सशक्त झाले पण विषय पूर्णपणे कळेनात. इंग्रजीच्या मागासलेपणाचा असा फटका बसल्याने १९७५ नंतर शिक्षकांना झेपत नाही या महान कारणामुळे गणित, विज्ञानातील असंख्य घटक पुताकांतून वगळावे लागले.
या सर्व शैक्षणिक वाताहतीतून पुन्हा उठून उभे राहण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला एक उपाय उपलब्ध आहे.
सर्व विद्यार्थ्यांना यापुढे मराठी माध्यमाच्या शाळेत घालणे किंवा विविध खुळचट युक्तिवादाला बळी पडून इंग्रजी माध्यमात घातलेल्या मुलांना घरी मराठी माध्यमाच्या पुस्तकातून, मराठी शब्दांसह मराठी वाक्यांच्या आधारे भाषेतर विषय म्हणजे गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल वगैरे विषय शिकवणे.
चला, नववर्षासाठी हा चागला संकल्प करून पुढील पिढीचे उत्तम भवितव्य घडवण्यास हातभार लावू या ! - अनिल गोरे, मराठीकाका.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.