Saturday, July 18, 2015

वाचा आणि मान खाली घालू नका तर परिस्थिती बदला !


महाराष्ट्राच्या शिक्षण खात्यातील काही अधिकारी मला भेटल्यावर विचारतात की ' फाडफाड इंग्रजी बोलण्यासाठी काय केले पाहिजे ? "
त्यांना फाडफाड इंग्रजी का बोलायचे आहे याची मी उत्सुकतेने चौकशी केली तेव्हा भलतीच माहिती हाती लागली. इंग्रजी माध्यम अशी पाटी लावलेल्या शाळेत हे अधिकारी कामानिमित्त गेले तर तेथील मंडळी फाडफाड इंग्रजी झाडतात आणि ते बहुधा व्याकरणदृष्ट्या चुकीचे असले तरी असे अधिकारी महाशय वेगाने झाडलेल्या इंग्रजीमुळे भारावून जातात. त्या शाळेतील लोकांसारखे चुकीचे आणि भराभर इंग्रजी झाडता येत नाही याचा न्यूनगंड अनेक अधिकाऱ्यांच्या मनात ठासून भरलेला असल्याचे मला आढळते.
मी अनेक शहरात गेल्यावर तिथल्या महाराष्ट्राच्या शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना मुद्दाम जाऊन भेटतो. तुम्ही महाराष्ट्र शासनाचे अधिकारी, प्रतिनिधी आहात, काहीजण तर राजपत्रित अधिकारीही आहात याची त्यांना जाणीव करून देतो. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा आहे याची त्यांना आठवण करून देतो. यातील अनेक अधिकाऱ्यांना व्यवस्थित इंग्रजी येते पण इंग्रजी माध्यमाच्या बहुतेक शाळांचे मुख्याध्यापक अपुऱ्या पात्रतेचे परप्रांतीय असतात आणि ते त्यांच्या प्रांतातील धाटणीने इंग्रजी झाडतात ते अधिकाऱ्यांना चटकन समजत नाही म्हणून ते अधिकारी स्वत:बाबत अकारण न्यूनगंड जोपासतात. हे अधिकारी जेव्हा इंग्रजी माध्यम शाळेत कामासाठी जातील तेव्हा राज्यशासनाचे प्रतिनिधी म्हणून जावे आणि गेल्या गेल्या " मला आवश्यक ती माहिती मराठीतून हवी" असे सांगावे, हे मी त्यांना सुचवतो. अलीकडे महाराष्ट्र शासनाचे अनेक अधिकारी असे करू लागले आहेत आणि त्यामुळे शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशी मराठीत सुसंवाद साधणारा एकतरी कर्मचारी शाळेत असावा याची धडपड इंग्रजी माध्यमाच्या शाळा करू लागल्या आहेत. - अनिल गोरे, मराठीकाका.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.