इंग्रजी माध्यमाच्या शाळेt प्रवेशासाठी अर्ज मिळण्याकरिता आदल्या रात्रीपासून शाळेबाहेर थंडीत कुडकुडत पदपथावर रांगेत थांबून अनेकांनी प्रवेश अर्ज घेतले. मराठी माध्यमाच्या तुलनेने शेकडोपट रक्कम भरून प्रवेश घेतला. काही रक्कम पावतीने आणि काही रक्कम विना पावतीने अशी भ्रष्टाचाराने घरातील चिमुकल्यांच्या शिक्षणाची पायाभरणी झाली. स्वत: मराठी माध्यमात शिकून उत्तम कारकीर्द घडलेल्या अनेक पालकांना कृतकृत्य वाटले.
दोन, तीन वर्षात या पालकांनी निवडलेल्या काही इंग्रजी माध्यम शाळांचे पितळ उघडे पडू लागले. पालकांनी उधळलेल्या पैशातून शाळा चालकाचे वैभव, बंगले, गाड्या, व्यवसाय वाढवत होता, शाळेतील शिक्षकांना अतिशय तुटपुंजा पगार होता. कमी पगारामुळे भरलेले कमी पात्रतेचे शिक्षक अधिक उत्पन्नाचे काम मिळताच सोडून जातात त्यामुळे दर तीन, चार महिन्यांनी नवीन शिक्षक मुलांना शिकवणार यामुळे अभ्यासाचे सातत्य राहिले नाही हेही काही पालकांच्या लक्षात आले. स्वत: मराठी माध्यमात शिकत असताना जे सामान्य ज्ञान आणि विषयांचे ज्ञान सहज, विनासायास आपल्याला चौथीच्या वर्गात मिळाले होते त्या मानाने फारच तुटपुंजे सामान्य ज्ञान आणि शालेय विषयांचे ज्ञान आपल्या मुलांना चौथीपर्यंत मिळाले हे त्यांच्या लक्षात आले. इंग्रजी माध्यमात घातल्याने मुलांची अफाट प्रगती होईल अशा रम्य आणि खोट्या सल्ल्याला भुलून घेतलेला निर्णय चुकीचा ठरला, या निर्णयाने नुकसान होत आहे असे जाणवताच काहींनी माध्यम बदलाचा निर्णय घेतला. २०१४ - १५ शैक्षणिक वर्षासाठी पाचवीत प्रवेश घेताना इंगजी माध्यमाच्या शाळेतून चौथी उत्तीर्ण दाखला काढून मराठी माध्यमाच्या शाळेत पाचवीला प्रवेश घेणारे काही पालक पुण्यात आढळले आहेत.
माध्यम परतावणी आवश्यक आहे असे निवेदन मी काल इथे दिले होते. मी ही मोहीम सुरु करण्यापूर्वीच काही पालकांनी स्वयंस्फूर्तीने माध्यम परतावणी कार्यक्रम पार पडल्याची माहिती मला मराठी शाळांच्या काही मुख्याध्यापकांनी कालच दिली. मुलांना प्रगत, समृद्ध, संपन्न मराठी भाषेतून विविध विषय शिकायची संधी पाचवीपासून उपलब्ध करून देणाऱ्या. या पालकांचे आभार आणि अभिनंदन ! या पालकांची तपशीलवार माहिती आणि मते लवकरच इथे प्रसिद्ध करण्याचा मी प्रयत्न करीन. - अनिल गोरे, मराठीकाका.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.