Saturday, July 18, 2015

मराठी माध्यम शाळांचे मारेकरी ! मराठी माध्यम शाळांच्या जीवावरच जगतात !!


मराठी माध्यम शाळा नावाचा एक विनोदी प्रकार सध्या महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत दिसतो. या शाळांतील उत्तम गुणवत्ता असलेले अनेक शिक्षित ( सुशिक्षित हा शब्द मुद्दाम टाळला आहे ) असे पुरुष आणि महिला शिक्षक इंग्रजीबाबत न्युनगंडाने पछाडलेले आढळतात.
अशा शिक्षकांच्या नसानसातून, त्यांच्या शब्दा - शब्दांतून आणि वाक्या - वाक्यांतून हा न्यूनगंड सतत व्यक्त होत असतो. या न्यूनगंडाच्या आहारी जाऊन अशा शिक्षकांनी मराठी माध्यम शाळांची क्षमता उत्तम असूनही या शाळांना अवकळा आणली आहे. न्यूनगंडाने भारलेल्या, पछाडलेल्या अशा शिक्षकांचे वर्तन, संभाषण लहान वयातील कोवळी मुले ऐकतात आणि मुलांची अशी समजूत होते की मराठी ही मराठी माध्यमाच्या शाळेत देखील वापरण्याच्या लायकीची भाषा नाही. इंग्रजी ही मराठीपेक्षा श्रेष्ठ भाषा आहे म्हणूनच आपले मराठी माध्यमाचे शिक्षक दर दोन शब्दागणिक एक इंग्रजी शब्द आपल्या तोंडावर मारतात. हे अनुभवणारा विद्यार्थी दहा पंधरा वर्षांनी स्वत: पालक झाल्यावर, सर्व इंग्रजी शब्द तोंडावर मारणारी शाळा शोधू लागतो. स्वत:ला उत्तम शिक्षण मिळालेली मराठी शाळा असे पालक टाळतात. आपल्याला मिळाले तसे उत्तम शिक्षण मिळाले नाही तरी चालेल पण न्यूनगंडातून अर्धवट इंग्रजी झाडणाऱ्या शिक्षकांच्या तुलनेने आत्मविश्वासाने चुकीचे पण पूर्ण इंग्रजी झाडणारे शिक्षक असणारी शाळा त्या पालकांना जवळची वाटू लागते.
मराठी माध्यमातील शिक्षक आपला न्यूनगंड वारंवार कसा प्रकट करतात त्याची काही उदाहरणे मी पुढे देत आहे.
हे शिक्षक एखाद्या मुलाला सांगतात " जा रे , चॉक घेऊन ये. " मुलाची खात्री पटते की खडू हा मराठी शब्द मराठी माध्यमाच्या शाळेतही वापरण्याच्या लायकीचा नाही आणि मराठी ही भाषा मराठी माध्यमाच्या शाळेतही वापरण्याचा लायकीची नाही.
१९८० नंतरअसे शिक्षक कोणाला भेटले की सांगत " मी मराठी मिडीयम स्कूलमध्ये टीचर आहे. "
शिक्षक हा मराठी शब्द उच्चारर्ण्याची यांना लाज वाटते. त्याचबरोबर सुपरवायझर, क्लार्क, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, ऑफिस, लायब्ररी, लाबोरेटरी, सेकंड फ्लोअर, अटेंडन्स, बेंच, बोर्ड, नोटीस बोर्ड, ग्राउंड, स्पोर्टस, पेपर, चेकिंग, इन्स्पेक्शन, बेल, पिरियड, या जगातील ४००० भाषांमधून इंग्रजांनी उचललेल्या सर्व शब्दांना अतिशय सुयोग्य, अर्थपूर्ण, अर्थवाही मराठी प्रतिशब्द आहेत याचे भानच न्यूनगंडाने पछाडलेल्या या शिक्षकांना राहिले नव्हते.अर्धी इंग्रजी - पाउण मराठी अशी विचित्र, विसंगत, अशिक्षितांना शोभेशी इंग्रजीशरण बडबड मराठी माध्यमातील हजारो न्यूनगंडी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थी - विद्यार्थिनींच्या समोर १९८० नंतर अविरतपणे केली.
१९८० पासून मराठी शब्द वापरणे बंद करून इंग्रजी शब्दांची मुजोरी आणि स्वत:ची इंग्रजीबाबत लाचारी दैनंदिन स्वरुपात प्रदर्शित केल्याने असल्या शिक्षकांपेक्षा स्वत:च्या भाषेबाबत आणि स्वत:च्या शाळेच्या माध्यमाबाबत किंचितही न्यूनगंड मानत नसलेले शिक्षक जिथे आढळले अशा इंग्रजी माध्यम शाळांकडे मराठी माध्यम शाळेतील माजी विद्यार्थी आणि पुढे पालक बनलेल्या विद्यार्थी - विद्यार्थिनींचा ओढ निर्माण झाला यात नवल ते कसले ?
आता मराठी माध्यम शाळांमधील शिक्षकांना सुरक्षितता आणि आणि मोठा पगार या गोष्टी हातून निसटण्याची भिती वाटू लागली असल्याने ते मराठी शाळा वाचवा म्हणून आंदोलने करतात पण यांना मराठी भाषेबाबत आत्म्विश्वास वाटत नसल्याने यांच्या शाळा यांच्यापासूनच वाचविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यांनी मराठी भाषेतील शब्द मराठी वाक्यात वापरण्याचे यापुढेही टाळले तर अशा शाळा बंद पडू देणेच योग्य होईल -- अनिल गोरे, मराठीकाका.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.