Saturday, July 18, 2015

इंग्रजी माध्यमाचे शुल्क वाढवा

सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आता जे शुल्क आहे त्याशिवाय आणखी किमान पाचपट शुल्क वाढवले पाहिजे तरच त्या शाळा मराठी माध्यम शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण देऊ शकतील. सर्व मराठीप्रेमी समूहाने इंग्रजी माध्यम शाळांमधील पाचपट( ५००% ) शुल्कवाढीला पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. असे वाढीव शुल्क भरताना पालक कर्जबाजारी झाले आणि शिवाय धड शिक्षण मिळाले नाही तरच पालक स्वानुभवाने शहाणे होऊन दर्जेदार अशा मराठी माध्यमाकडे वळतील. मराठीप्रेमी समूहातील सर्वांनी कृपया इंग्रजी माध्यम शाळांमधील शुल्कवाढीबाबत टीका करणे थांबवावे असे मी आवाहन करतो. त्या शाळा जितक्या मोठ्या प्रमाणात आणि जितक्या वेगाने शुल्क वाढवतील तितक्या वेगाने त्या शाळा सोडून मराठी माध्यमाकडे येणारे विद्यार्थी वाढतील. इंग्रजी माध्यम शाळांमधील पाच टक्के विद्यार्थी कमी झाले तर त्यांना पुन्हा ७ % शुल्कवाढ करावी लागेल. १० % विद्यार्थी कमी झाले तर पुन्हा १५ % शुल्कवाढ करावी लागेल.
आत्ताच्या शुल्कात महाराष्ट्र किंवा भारतातील एकही इंग्रजी माध्यम शाळा दर्जेदार शिक्षण देऊ शकत नाही, कारण या शुल्कातून शिक्षकांना अतिशय कमी वेतन देता येते. कमी वेतनामुळे कमी पात्रतेचे शिक्षक नेमावे लागतात म्हणून १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, आय आय टी, एनडीए, बँक भारती, रेल्वे भारती, युपीएससी, एमपी एस सी, पोलीस भारती, लष्कर भारती, परदेशी जाण्यासाठी आवश्यक जी आर ई, टोफेल या खास इंग्रजी भाषा विषयक परीक्षांत देखील इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी मागे असतात.
या कमतरतेवर मात करण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या गल्लीबोळातील शाळा सध्या जितके शुल्क घेतात त्याच्या किमान सहापट किंवा त्याहून अधिक शुल्क त्यांनी घेणे योग्य ठरेल. एकतर इतके भरमसाठ शुल्क देणे किंवा मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मराठी माध्यम शाळा निवडणे असे दोनच पर्याय पालकांपुढे आहेत.
मराठी माध्यम, मराठी भाषा आणि मराठी माणसे यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी इंग्रजी माध्यम शाळांची प्रचंड शुल्कवाढ अतिशय आवश्यक आहे. मराठीवर मनापासून प्रेम करणाऱ्यांनी
" चला, इंग्रजी शाळांचे शुल्क वाढवू या ! "
नावाचा एक नवीन समूह स्थापन केला पाहिजे. जगातील कोणाचेही अपार शैक्षणिक नुकसान करणारे इंग्रजी माध्यम जगातून नष्ट होण्यासाठी अशी शुल्कवाढ चळवळ अतिशय आवश्यक आहे. - अनिल गोरे, मराठीकाका.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.