पोटासाठी आणि अन्य मोठ्या यशासाठी मराठी माध्यमातून शिक्षण घेणे हा अतिशय सोपा, सहज आणि कमी खर्चिक पर्याय आहे. पालकांनी आपल्या मुलांसाठी हा पर्याय निवडल्यास शालेय शिक्षणातील उत्तम प्रगतीशिवाय शाळाबाह्य उपक्रमात देखील मुलांना प्राविण्य लाभून सर्वांगीण प्रगतीचा मार्ग प्रशस्त होतो.
नवतरुण पालकांनी खोटी माहिती, भ्रामक कल्पना यावर विश्वास ठेवून इंग्रजी माध्यम अशी पाती झळकवणाऱ्या एखाद्या NON TEACHING EDUCATIONAL INSTITUTE मध्ये मुलांना प्रवेश मिळवण्याची धडपड टाळावी आणि आपल्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून महाराष्ट्रात शाळा प्रवेश घेताना मराठी माध्यमाची शाळा निवडावी. १० वी नंतर निराश, हताश होण्यापेक्षा मुलांचे शिक्षण सुरु होतानाच मराठी माध्यमाचा सर्वोत्तम पर्याय स्वीकारावा, असे आवाहन !
सर्व नवतरुण पालकांनी आपल्या मागल्या पिढीतील किती पालक, मुलांसाठी इंग्रजी माध्यम निवडल्यामुळे मुलांच्या १० वी नंतर निराश, हताश झाले आहेत याची स्वत: माहिती घ्यावी; कारण सध्याच्या सामाजिक दबावामुळे अनेक जण निराश, हताश झाले असले तरी आपली ही स्थिती उघडपणे सांगत नाहीत. मराठी माध्यम निवडण्याचा आपापल्या पालकांनी, मित्रांनी दिलेला उत्तम सल्ला त्यांनी त्यापूर्वी १२ वर्षे आधी धुडकावून लावलेला असतो. १२ वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची कबुली देण्याचे धैर्य बहुतेक पालकांत नसते, म्हणून नवतरुण पालकांनी आपल्या अगोदरच्या पिढीतील पालकांनी कोणत्या अपेक्षेने इंग्रजी माध्यम निवडले आणि ती अपेक्षा किती प्रमाणात पूर्ण झाली याची माहिती आपल्या जवळच्या संबंधातील निराश, हताश पालकांना न दुखावता युक्तीने काढून घ्यावी. निराशा, हताशा हे अनुभव स्वत:च घेण्याचा हट्ट न करता इतराच्या अनुभवातून शहाणे होणे हा अधिक चांगला मार्ग आहे.
सर्व संबंधितांनी याबाबत गंभीरपणे विचार करावा, असे मी सुचवतो. - अनिल गोरे, मराठीकाका.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.