Saturday, July 18, 2015

मराठीचा वापर आणि वेळेची बचत

अनेकांच्या प्रयत्नाने आणि मराठी माध्यमातून शिकण्याचे विविध लाभ समजावून घेतल्याने गेली काही दशके मराठीविरोधी बनलेल्या पुणे शहरातील अनेक पालक आता मराठी माध्यमाकडे वळत आहेत. अशा पालकांना उभारी देण्यासाठी दोन उपाय आवश्यक आहेत. भारतातील अंतर्गत कामकाजात निर्बुद्धपणे होत होत असलेला इंग्रजीचा अतिरेकी आणि अनावश्यक वापर तातडीने थांबवला पाहिजे. दुसरा उपाय म्हणजे भारतीय भाषा माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीत प्राधान्य देण्याचा चांगला नियम केला पाहिजे. ( तामिळनाडू आणि बंगाल राज्यात असे नियम आहेत, )
मी स्वत: गेल्या १६ वर्षात प्रत्येक व्यवहारासाठी केवळ देवनागरी मराठी अंक आणि देवनागरी लिपीतून अक्षरी रक्कम आवश्यक तिथे सर्व ठिकाणी लिहिली आहे. १६ वर्षांच्या पूर्वी मी FIVE HUNDRED ONLY असे लिहिलेले धनादेश देत असे. ही रोमन लिपीतील १५ इंग्रजी अक्षरे चौदा वेळा वाचली जात आणि तीन वेळा लिहिली जात. आता मी पाचशे फक्त असे लिहितो. १५ अक्षरांऐवजी ५ अक्षरे चौदा वेळा वाचणे आणि तीन वेळा लिहिणे यात खूप वेळ वाचतो. पूर्वी मी आठ माणसांवर १५ अक्षरे लादून त्यांचा छळ करीत होतो तो आता थांबला आणि तितक्या लोकांचा वेळ वाचला. भारतात दररोज काही अब्ज धनादेश, विमा प्रस्ताव आवेदनपत्रे, प्रवेश आवेदनपत्रे आणि इतर असंख्य ठिकाणी नाव, पत्ते लिहिले आणि अनेकदा वाचले जातात. लिहिले आणि अनेकदा वाचले जातात. हे सर्व काम सोयीच्या कोणत्याही भारतीय भाषेत करणे शक्य असेल तिथे करायचा निर्धार आपण केला तर देशातील सर्व लोकांच्या आयुष्यातील प्रचंड वेळ अनुत्पादक कामात गुंतणार नाही आणि तो वेळ उत्पादक कार्यात उपयुक्त ठरेल. - अनिल गोरे, मराठीकाका
बूस्ट

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.