पुण्यातील माझा एक मराठी भाषिक मित्र लोकांना वीजमित्र (inverter), विद्युत घट इ. वस्तू विकून त्यांची पुढे देखभालही करतो. त्याचे सर्वच्या सर्व ग्राहक मराठी भाषिक असूनही त्याला मात्र इंग्रजीचा जबरदस्त किडा चावलेला होता. त्याचे पुण्यातील जवळचे दोन स्पर्धक असून एक गुजराती आणि एक मारवाडी असून ते स्पर्धक काही वर्षांपूर्वी स्वत: महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांना मराठीचा गंध नव्हता. तिघांचा व्यवसाय साधारण एकाच वेळी सुरु झाला पण दहा वर्षांनी ते दोघेही व्यवसायात माझ्या मित्रापेक्षा पुढे होते. गुजराती, मारवाडी मुळातच धंद्याला हुशार म्हणून ते आपल्यापुढे असणारच या अंधश्रद्धेमुळे ते पुढे असावेत असे माझ्या मित्राचे प्रामाणिक मत होते.
मी एकदा सहज त्याची आणि त्याच्या स्पर्धकांची माहितीपत्रके, जाहिराती यांचे निरीक्षण केले. त्याचे अमराठी स्पर्धक सर्व कागदपत्रे, पावत्या, माहितीपत्रके, वेष्टणे, ओळखचिठ्ठी, शीर्षपत्रे यावर कटाक्षाने मराठीचा वापर करतात. माझ्या मित्राला मात्र लहानपणापासून त्याच्या मराठी माध्यम शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, त्याच्या घरातील कारकुनी पेशातील लोक, त्याचे रिकामटेकडे मित्र आणि व्यवसाय म्हणजे काय याची किंचितही कल्पना नसलेले सल्लागार या सर्वांनी "इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने धंदा करायचा तर इंग्रजीपुढे व्यवस्थित लोटांगण घातले पाहिजे ", असे बजावले होते.
व्यवहारशून्य पण पुस्तकी शिक्षण घेऊन इंग्रजीची भलावण करणाऱ्या लोकांच्या नादी लागून या मित्राने आपला व्यवसाय १०० % इंग्रजीत चालवला होता. इंग्रजीच्या अतिरेकामुळे तो व्यवसायात मागे पडला. तीन वर्षांपूर्वी मी त्याच्याकडून वीजमित्र घेताना त्याला त्य वस्तूवर वीजमित्र अशी ठळक अक्षरे उमटवून द्यायला लावली, त्यासाठी तो अगोदर टाळाटाळ करीत होता पण मराठी अक्षरे त्या वस्तूवर नसली तर मी खरेदीच करणार नाही हे कळल्यावर त्याने नाईलाजाने माझी मागणी पूर्ण केली. मी त्या व्यवहाराची पावतीही स्वतंत्रपणे मराठी या जगातील पहिल्या आणि प्रगत, आधुनिक भाषेत मराठी शब्दांसह मराठीत टंकित करून द्यायला लावली. ही घटना खरी आहे का ? अशी शंका असलेल्या सर्व शंकासुरांना माझा वीजमित्र आणि मराठी पावती वैगेरे पाहण्यास आमंत्रण देत आहे ! त्याने अधिकाधिक मराठीचा वापर सुरु केल्यावर मी त्याला माझ्या परिचयातील अनेक ग्राहक देखील मिळवून दिले. माझ्या मित्रासाठी आज मराठी ही पोट भरभरून भरणारी भाषा ठरते आहे.
आता तो त्याच्या स्पर्धकांच्या तुलनेत मागे नाही. ग्राहकाच्या भाषेतून व्यवहार करणे हे धंद्यातील एक चातुर्य आहे.
काही दिवसांनी त्याने मला एक एक दोनोळी ( दोन ओळींची कविता ) ऐकवली.
मराठीची करून नांदी
मंदीत धंद्याची चांदी !
- अनिल गोरे, मराठीकाका.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.