Saturday, July 18, 2015

मराठी शब्दसंपदा वाढविण्यासाठी मराठी शब्दांच्या भेंड्या !


शाळेत दोन - दोन मुलांच्या जोड्या करून भेंड्या खेळता येतील किंवा किंवा दोन गट करून खेळता येतील. एका विद्यार्थ्याने किंवा एका गटाने एक मराठी शब्द सांगावा. त्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा ( व्यंजनाचा ) प्रतिस्पर्ध्याने वेध घ्यावा. शेवटचे व्यंजन 'ण' असेल तर त्याच्याजागी 'न' मानायला मोकळीक असावी आणि 'ळ' च्या जागी 'ल' मानायला मोकळीक असावी. एकाने किंवा एका गटाने सांगितलेल्या शब्दातील शेवटचे व्यंजन ज्या शब्दाचे पहिले व्यंजन असेल असा शब्द प्रतिस्पर्ध्याने सांगावा. एकदा सांगितलेला शब्द पुन्हा येणार नाही, सांगितलेला शब्द मराठीच असेल हे नियम आवश्यक आहेत. नियमाचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी कोणीतरी पंचाचे काम करू शकतील. याप्रमाणे खेळ अनंत काळ सुरु राहतो आणि विद्यार्थ्यांची शब्दसंपदा मात्र प्रचंड वाढते. हा खेळ जसा बोलून खेळता येतो तसाच संगणकावर, भ्रमणध्वनीवर शब्द लिहून देखील खेळता येईल आणि त्यामुळे अगोदर वापरलेला शब्द पुन्हा वापण्यास आपोआप बंदी होईल कारण वापरलेल्या शब्दांचा पुरावा असेल.
हा खेळ दोनजण ते कितीही जण खेळू शकतात. मुलांना याचा कधीच कंटाळा येणार नाही. एक गट दुसऱ्या गटावर कायम एकच व्यंजन येईल असे शब्द शोधून प्रतिस्पर्ध्याला स्थिती अडचणीची करू शकतील, पण असे करण्यासाठी प्रत्येकाला स्वत:ची मराठी शब्दसंपत्ती वाढवावी लागेल. या खेळांत आणखी कठीण पायऱ्या निर्माण करता येतील. त्यासाठी शब्दांच्या प्रकारावर बंधने वाढवून नियमात पुढील बदल केले की स्पर्धा अधिकाधिक कठीण होईल.
१] एका गटाने दुसऱ्यावर कोणते व्यंजन लादायचे हे एका गटासाठी निश्चित करावे आणि दुसऱ्या गटावर असे बंधन नसावे.
२] दोन्ही गटांना प्रतिस्पर्ध्यावर त्यांनी कोणते व्यंजन लादायचे याचे बंधन असावे.
३] कोणत्या क्षेत्रातील शब्द सांगायचे याचे बंधन असावे उदा. नातेवाईकांची नावे आणि नाती; खेळासंबंधी शब्द. शाळेसंबंधी शब्द. ई.
४] शब्द सांगण्यात मुले कुशल बनली की नंतर शब्द लिहून भेंड्या खेळाव्यात
५] शब्दांच्या भेंड्या खेळण्यात मुले पुरेशी कुशल झाली की मग मराठी वाक्यांच्या भेंड्या खेळाव्यात. वाक्ये व्याकरणदृष्ट्या अचूक हवीत असा नियम असावा.
६] वाक्यांच्या भेंड्या जमू लागल्या की, तीन शब्दांची अर्थपूर्ण वाक्ये किंवा चार शब्दांची अर्थपूर्ण वाक्ये असावीत असा नियम करावा. प्रतिस्पर्धी गटासाठी वाक्यातील शब्दसंख्या वेगवेगळी ठेवून भेंड्या खेळण्यातील रंगत आणि चुरस, स्पर्धा अधिकाधिक वाढवता येईल.
मी १९९६ ते २००१ या काळात कामानिमित्त नियमित मुंबईत जात असे. मुंबईच्या उपनगरी गाडीतून तास, दोन तास प्रवास करताना मी अनोळखी लोकांना देखील भेंड्या खेळू या का ? असे विचारून मराठी शब्दांच्या भेंड्या खेळत असे. त्या पाच वर्षात वेळ घालवायला भेंड्या खेळणारे ३५ गट मुंबईच्या उपनगरी प्रवाशांमध्ये स्थापन झाले होते. या गटातील लोकांना दररोज अनेक विसरलेले मराठी शब्द या खेळामुळे आठवले. या मराठी शब्द भेन्द्यांचा आणखीही एक चांगला परिणाम झाला होता. एखादा गट मराठी शब्दांच्या भेंड्या खेळत असताना त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या अमराठी प्रवाशांनाही अनेक मराठी शब्द ऐकून ऐकून परिचित होऊ लागले होते. या गटांना त्यांनी भजनी मंडळाप्रमाणे नावेही दिली होती. शब्दप्रभू गट, वाचासिद्धी गट अशी दोन नावे मला अजून आठवतात. आता हे गट किती वाढले असतील याची कल्पना नाही पण मुंबईच्या उपनगरी गाडीतील कोणीही आणखी असे गट निर्माण करू शकतो. मराठीच्या प्रसाराची ही सोपी, बिनखर्चाची संधी अधिकाधिक मुंबईकर मराठी प्रवाशांनी आणि इतर सर्व प्रवाशांनी, खेळाडूंनी, कार्यकर्त्यांनी, महिलांनी, तरुणांनी साधावी, असे आवाहन ! महाराष्ट्रात, देशात, परदेशात कोठेही नवे गट स्थापन झाल्यास कृपया मला ९४२२००१६७१ या क्रमांकावर संपर्क साधून कळवावे, ही विनंती ! आज एक जुनी आठवण आली म्हणून इथे टाकली.
मोठ्या माणसांप्रमाणेच हा खेळ मुले डबा खाताना, वाहनात बसून शाळेतून घरी किंवा घरून शाळेत जाताना खेळू शकतील. हा खेळ देशात, परदेशात कोठेही खेळता येईल. घरी मित्रांशी, ऐशी, बाबांशी, दादाशी, ताईशी आणि वेळ मिळेल तेव्हा कोणाशीही, कधीही खेळू शकतील. आत्ता उन्हाळ्याची सुट्टी येत आहे. अनेक मुलांना सुट्टी लागल्यावर खूप आनंद होतो पण बरीच मुले पहिल्या आठ दिवसातच सुट्टीला कंटाळतात. अशा कंटाळ्यावर मराठी शब्दांच्या किंवा मराठी वाक्यांच्या भेंड्या हा एक ' लय भारी ' उपाय आहे. - अनिल गोरे, मराठीकाका

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.