Saturday, July 18, 2015

माझा मित्र पांडुरंग याची सुरस आणि प्रेरणादायी कथा !


एक तप झाले त्या गोष्टीला ! माझा मित्र पांडुरंग याने मुलाला मराठी माध्यमात घालावे की इंग्रजी याचा खूप काथ्याकूट करून घरातील स्त्रीहट्टापुढे हार मानून मुलाला एका भारदस्त नावाच्या इंग्रजी माध्यम शाळेत दाखल केले. स्वत:च्या आणि पत्नीच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी झालेल्या एकूण खर्चाच्या पाचपट रक्कम भरून त्याने मुलासाठी ज्यु. के.जी ला प्रवेश घेतला.गावातील बंद पडत आलेल्या किरण मालाच्या दुकानदाराने ते दुकान बंद करून गावातील लोकांना दर्जेदार इंग्रजी माध्यम शाळा देण्याच्या हेतूने शाळा सुरु केली होती. पांडुरंगाचे खाते पूर्वी त्याच दुकानात असल्याने लक्ष्मीबाईच्या ओळखीने (देणगी आणि भक्कम शुल्क ) सहज प्रवेश मिळाला. पोराला शाळेत शिकवायला केरळमधील १०० % साक्षर ( स्वाक्षरी करता येणारी स्वाक्षर ) शिक्षिका नेमलेली होती. शाळेच्या पहिल्या दिवशीच त्या शिक्षिकेने पांडूच्या पोराणे केलेल्या मराठी बोलण्याच्या गुन्ह्याबद्दल दोन तोंडात ठेवून दिल्या. पोराच्या तोंडावर उठलेल्या वळाचे पांडूपत्नी वहिनींना कोण कौतुक वाटले. एक महिन्यानंतर त्या केरळी शिक्षिकेने पालकसभा घेऊन सर्व पालकांना हिंदीतून दम भरला "तुम लोकोका बच्चालोक बहुत म्हराटी बोलताय ! ये बात बहोत गलात हय इसके आग्गे अगर वैसाच चालू रह्या तो तुमारा बच्चाका स्कूल लिविंग सर्टिफिकेट तुमको दिया जायेगा |
या पालकसभेनंतर अनेक दिवस पांडूपत्नी वहिनी अनेक दिवस कौतुकाने सांगत होत्या की, "शाळेच्या बाई खूप विद्वान आहेत, कारण त्या एकही मराठी शब्द बोलत नाहीत."
पांडूचे चिरंजीव मनात आलेले काहीतरी आईला मराठीत सांगायला जायचे तेव्हा ती माउली त्याला ' आई ' हा य:कश्चित मराठी शब्द उच्चारल्याबद्दल अगोदर धपाटा घालायची आणि म्हणायची " स्पीक इन इंग्लिश हं | ' . इंग्रजी माध्यमातील बहुतेक मुलांप्रमाणे पांडूच्या मुलानेही हळूहळू आईबाबांशी बोलणे बंद केले, कारण त्याला जे सांगायचे ते लहानपणी फक्त मराठीतून सांगणे शक्य होते आणि त्याबद्दल धपाटा मिळायचा ! आठवीपर्यंत अनुत्तीर्ण करायचे नाही हा ना. शिक्षणमंत्री वसंत पुरके यांचा आदेश शाळा काटेकोरपणे पाळत असल्याने पांडूचा मुलगा झोकात आठवी उत्तीर्ण झाला. आठवीपर्यंत हा मुलगा राष्ट्रीय भाषा बोलू लागला होता, त्याचे त्याच्या माउलीला फार कौतुक होते. एकही मराठी शब्द नीट उच्चारता येत नसलेला हा मुलगा जिल्हा परिषदेच्या सामान्य शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या आणि पालकांच्याही आदरास पात्र ठरला होता. त्याच्या शाळेत मराठीसाठी केरळी शिक्षक, हिंदीसाठी तमिळ शिक्षक, इंग्रजीसाठी उत्तर प्रदेशातून हिंदी साहित्यात बी. ए. अनुत्तीर्ण असलेल्या सेवाभावी शिक्षिका नेमल्या होत्या. विज्ञान आणि गणितासाठी बारावीची आर्टस परीक्षा परीक्षा केवळ तीनच प्रयत्नात उत्तीर्ण झालेला शेजारच्या गावातील तडफदार तरुण शिक्षक नेमलेला होता. महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास शिकवण्यासाठी त्याला नेपाली शिक्षक होते आणि पी.ती.साठी किरकोळ शरीरयष्टीचे एक गुजराती को ओरडीनेतर कार्यभार सांभाळत होते. या सर्वाशी जमेल तसे बोलताना पांडूच्या मुलाची भाषा राष्ट्रीय भाषा बनली होती आणि तो किंवा त्याच्या शाळेतील मुले नेमके काय बोलतात हे गावात अनेकांना समजत नसल्याने या मुलांबाबत गावात प्रचंड आदर वाढला होता.
स्वत: एकही मराठी शब्द न उच्चारणारे आणि मुलांनाही शाळेत किंवा गावात मराठी बोलू न देणारे आणि स्वत: रात्रंदिवस जमेल तसे मोडक्या तोडक्या हिंदीत संवाद साधणारे हे सर्व शिक्षक संपूर्ण गावाच्या आदरास पात्र ठरले होते. गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुले ४ थी आणि ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकली पण असल्या सामान्य परीक्षेला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांच्या पालकांनी महत्व देऊ नये असा आधुनिक विचार सर्व शिक्षकांनी पालकांच्या मनावर बिंबवला होता. शिष्यवृत्ती परीक्षेत पांडूच्या मुलाला ४ थीत ३०० पैकी ५७ आणि ७ वीत ३०० पैकी ३३ गुण मिळाले याबद्दल पांडूला थोडे वाईट वाटले पण पांडूपत्नी वहिनींनी त्याला समजावले की, " मुलाच्या शाळेतील सर्वांनाच असे गुण आहेत शिवाय ही मुले मुळात शिष्य्वृत्तीसारख्या सामान्य परीक्षेसाठी नाहीतच मुळी ! ही मुले सी. ए. इंजिनिअर, एमबीए होऊन अमेरिकेत जाणार असल्याने असल्या किरकोळ निकालाकडे लक्ष देऊ नये " . पांडूने हा युक्तिवाद स्वीकारला.
मागच्या महिन्यात पांडूच्या मुलाचा इ. १० वी चा निकाल लागला. ८५ % गुण मिळाले. निकालानंतर चार दिवस पांडू आणि वाहिनी मुलाला सी.ए करायचे का इंजिनिअर का थेट चाईल्ड स्पेशालीस्ट करावे याबाबत वाद घालत होते. शेजारच्या शहाण्या काकांनी त्यांना सांगितले की,
" अगोदर मुलाच्या इच्छेचा अंदाज घ्या."
पांडूच्या मुलाने स्पष्ट सांगितले " मला ११ वीला प्रवेश नको आहे. तुम्ही मला ज्या शाळेत घातले होते तिथे मला कोणताही विषय समजला नाही. पुढच्या शिक्षणात तुमचे पैसे वाया जाऊ नयेत म्हणून मी पुढे काहीतरी वेगळे शिकावे असा विचार केला आहे. मला आय टी आय ला जायला आवडेल. आपल्या गावात ज्यांनी आय टी आय केले ते सर्वजण चांगली नोकरी करतात. जे जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यम शाळेत शिकले ते प्रत्येक वर्षी वेळेवर पास होऊन इंजिनिअर झाले पण इंग्लिश मिडियमला शिकलेल्यांना चार वर्षाचे इंजिनिअरिंग पुरे करायला ५ किंवा ६ वर्षे लागली. त्यातील अनेकजण इंजिनिअरचे काम मिळत नसल्याने जमेल ते इतर काहीतरी काम करतात, त्यांच्यापेक्षा मला आय टी आय करून अधिक चांगली नोकरी मिळेल. बाबा, बारा वर्षापूर्वी तुम्ही मला इंग्रजी माध्यमात का घातले ? तुम्ही असे केले नसते तर मीही ११ वी प्रवेश घेऊन पुढे शिकू शकलो असतो. मी पुढे इंग्रजी माध्यम शाळा काढीन. आमच्या शाळेच्या चेअरमनचे जसे तीन बंगले, एक फार्म हाउस आणि सहा गाड्या आहेत तशी आपली भरभराट होईल. "
मुलाची लहान वयातील समज लक्षात घेऊन भारावलेला माझा मित्र पांडुरंग उत्साहाने नव्या इंग्रजी माध्यम शाळेसाठी जागा शोधत आहे. त्याची पुढील बारा वर्षात भरभराट होणार यात मला काही शंका वाटत नाही.
ग्रामीण असो की शहरी, प्रत्येक ठिकाणी असे अनेक पांडुरंग असतील, त्यांनी भविष्याचा विचार करावा आणि आवश्यक असेल तर वेळीच माध्यम बदलून मराठी माध्यम स्वीकारावे, मुलांच्या मोठ्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करावा असे मी सुचवतो. - अनिल गोरे, मराठीकाका.

इंग्रजी शाळांचा दर्जा

श्री. सुधीर काळे, श्री. जय दीक्षित, श्री. कौस्तुभ देशपांडे, श्री. आदि जोशी यांच्यासारख्या इंग्रजी माध्यम समर्थकांना सामाजिक कार्याची आणखी एक सुवर्णसंधी !
भारत देशात औपचारिक शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये इ. ८ वी ते १० वी दरम्यान गणित विषय ( यात बीजगणित आणि भूमिती हे दोन भाग असतात. ) शिकवण्यासाठी बी. एस्सी. ( गणित ) म्हणजे अगदी B.Sc. ( mathematics) नावाचा शासनमान्य विद्यापीठाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेला आणि त्यासह शासनमान्य विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड. ) अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेला/ली उमेदवार नेमावा/वी असा स्पष्ट नियम आहे.
इंग्रजी माध्यमाचे आंधळे समर्थक ज्या इंग्रजी माध्यम शाळांमध्ये पालकांनी आपली मुले शिकवलीच पाहिजेत असा सल्ला देत आहेत त्यापैकी
<<<<< Art of expensive living च्या आणि इतर ICSE नमुन्याच्या विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळा, CBSE नमुन्याच्या विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळा, महाराष्ट्र शासनच्या नियंत्रणातील राज्य मंडळाशी संलग्न इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळा >>>>>>>
अशा बहुतेक शाळांमध्ये अशा पात्रतेचे शिक्षक मुळात उपलब्धच नाहीत. वर वर्णन केलेल्या बहुतेक सर्व शाळांमध्ये फळ्याजवळ उभे राहून गणित विषय शिकवण्याचा अभिनय करणारे ८० % लोक बी. एस्सी. प्राणीशास्त्र (zoology) किंवा वनस्पतीशास्त्र ( botany ) या अभ्यासक्रमांचे उत्तीर्ण पदवीधारक आहेत किंवा काही अनुत्तीर्ण स्थितीत आहेत. अशा बी. एस्सी. प्राणीशास्त्र (zoology) किंवा वनस्पतीशास्त्र ( botany ) उत्तीर्ण अथवा अनुतीर्ण अभिनेत्यांचे/ अभिनेत्रींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील अनेकांना १० वी उत्तीर्ण होण्यासाठी गणिताची परीक्षा एकापेक्षा अधिक वेळा द्यावी लागलि होती. त्यांच्या मनात १० वी पासून गणिताची भिती ठाण मांडून बसल्याने ११ वी ते पदवी काळात त्यांनी गणित विषय निवडला नव्हता. वरील ८० % मंडळीतील अनेकांनी बी. एड. पदाविचाही पर्याय निवडलेला नाही.. या ८० % अभिनेते / अभिनेत्री वगळता उरलेल्या २० % लोकांत रसायनशास्त्र, अन्न निर्मिती, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, भूशास्त्र, मानसशास्त्र या आणि अशा अनेक शाखांमधील पदवीधर, पदविकाधारक तसेच १२ वी उत्तीर्ण अशा पात्रतेची मंडळी आहेत. अशा सर्व विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांची पात्रता तपासण्याचे कष्ट सरकारी शिक्षण विभाग घेत नाही, किंवा त्यांना तसा अधिकार नसावा. मी ही बाब २००५ पासून अनेक लेख, फलकाद्वारे उघड केली असून गेल्या दहा वर्षात अशा एकही शाळेने किंवा शिक्षकाने माझ्या माहितीपेक्षा वेगळी म्हणजे अधिक बरी स्थिती असल्याचे कळवलेले नाही.
एखाद्या विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळेत गणित शिकवण्यासाठी नेमलेला एखादा कायम शिक्षक / शिक्षिका बी. एस्सी गणित आणि बी. एड. हे दोन शासनमान्य विद्यापीठाचे अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेला/ ली आहे काय याचा मी २००५ पासून शोध घेत आहे. इंग्रजी माध्यमाचे समर्थन करणाऱ्या सर्व जाणत्या विद्यार्थी, पालक, पालकांचे पालक आणि शिक्षित, अशिक्षित, साखर, निरक्षर, गरीब, श्रीमंत, देशी मुक्कामी आणि परदेशी मुक्कामी असलेल्या सर्वांना विनम्र आवाहन की, महाराष्ट्रातील आपल्या माहितीच्या कोणत्याही विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळेत वरीलप्रमाणे शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेचे शिक्षक असल्याचे आढळले तर कृपया मला कळवावे. शासनाचा नियमच चुकीचा आहे आणि गणित शिकवण्यास ११ वी पासून गणित विषय न शिकलेले शिक्षकच अत्यावश्यक आहेत असे ज्यांचे मत असेल त्यांनीही आपले हे मत कळवावे, ही विनंती !
माझा संपर्क marathikaka@gmail.com असा आहे.
ज्यांनी सध्या देश परदेशातील थोरामोठ्यांच्या सल्ल्याने, मराठी माध्यमाला नाके मुरडून, अतिशय विचारपूर्वक आणि अत्यंत हौसेने आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळेत घातली आहेत त्यांनीही आपल्या मुलांना गणित शिकवणारे गुरुजी / गणित शिकवणाऱ्या बाई यांच्याकडे बी. एस्सी. ( गणित ) म्हणजे अगदी B.Sc. ( mathematics) नावाचा शासनमान्य विद्यापीठाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेला आणि त्यासह शासनमान्य विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड. ) अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्याचे अधिकृत आणि खरे प्रमाणपत्र आहे का ? याची चौकशी करावी, असे मी सुचवतो. 
जाताजाता , ८ वी ते १० वी च्या वर्गांना इंग्रजी भाषा विषय शिकवण्यासाठी बी. ए. (इंग्रजी भाषा ) अशा पात्रतेचे शिक्षक नियमानुसार आवश्यक असतात तसे आहेत का ? याचीही चोकशी करावी. माहिती मिळाल्यास मलाही कळवावी, ची विनंती !
ज्या शाळेत असे विहित किमान पात्रतेचे ( minimum required qualification ) शिक्षक गणित शिकवत असतील त्या शाळा सहजपणे माहिती देतील. ज्यांच्याकडे या किमान पात्रतेचे लोक शिकवत नाहीत ते टाळाटाळ करतील. अनेक विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळांमधील इंग्रजी भाषा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचे स्वत:चे शिक्षण नेमके काय आहे हे कळल्याने शिक्षित, उच्चशिक्षित पालकांची तेवढीच घटकाभर करमणूक होईल अशी मला खात्री वाटते. अशी करमणूक झाली तर स्वत:च्या अफाट खर्चाने ती करमणूक चालू ठेवायची का ती करमणूक बंद करून शहाणपणाने इंग्रजी माध्यमातील प्रवेश रद्द करून मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळेचा पर्याय विनासंकोच निवडायचा याचा विचार करून ठेवावा, असे मी सुचवतो. जुन्नर तालुक्यात अनेकांनी अशी पाहणी करून इंग्रजी शाळेतील मुले काढून मराठी माध्यमात घटली त्यांचे अभिनंदन ! .
असे विहित पात्रताधारक शिक्षक विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळांमधील बहुतेक शाळांमध्ये नाहीत. अशा सर्व शाळांनी विहित पात्रताधारक शिक्षक नेमावेत यासाठी इंग्रजी माध्यम समर्थकांना प्रयत्न करता येतील आणि ती समाजसेवेची मोठी म्हणजे अगदी प्रचंड संशी आहे. विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळा पालकांकडून कितीही पैसा घेतला तरी शिक्षकांना अतिशय तुटपुंजे वेतन देत असल्याने आणि इतर अनेक सोयी सवलती मुळीच देत नसल्याने विहित पात्रतेचे पदवीधर अशा शाळांकडे नोकरीसाठी अर्जाच करीत नाहीत. पुरेशी पात्रता असणाऱ्यांनी व्रत म्हणून विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळांमध्ये कमी पगारावर शिकवावे अशी प्रेरणा देण्याचे महान कार्य देखील इंग्रजी माध्यम समर्थकांना करता येईल. समाजसेवेच्या प्रचंड संधी आपली वाट पाहत आहेत. हे कार्य तडीस नेले तर गेला बाजार नोबेल नक्कीच मिळेलच, शिवाय महाराष्ट्र इंग्रजीभूषण, इंग्रजी माध्यम उद्धारक असे प्रतिष्ठेचे जागतिक पुरस्कार देखील आपली वाटच पाहत आहेत.
वरील प्रकारच्या विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मुलांना शिकवण्याचा आग्रही सल्ला देण्याआधी वरील भयंकर त्रुटी दूर झालेल्या असतील तर दिलेल्या सल्ल्याने लोकांचे भले होण्याची थोडीशी शक्यता आहे. सर्व इंग्रजी माध्यम समर्थकांणी ही सुवर्णसंधी (सुवर्णसंधीला इंग्रजीत काय म्हतात ते महित असलेल्यांनी ते समजावे ) सोडू नये असे विनम्र आवाहन !
असो, यावर्षी इ. १० वीच्या सर्व बोर्डांचा विक्रमी ९५ % निकाल लागला आणि महाराष्ट्रातील ११ वीच्या प्रवेशाची प्रक्रिया संपल्यावर ४० % जागा रिकाम्या राहिल्या आहेत. इंग्रजीकेंद्रित शालेय शिक्षणानंतर महाराष्ट्रातील किती विद्यार्थी तसलेच इंग्रजीकेंद्रित उच्चशिक्षण घेण्यास उत्सुक आहेत याचा हा पुरावाच मानायला हवा. - अनिल गोरे, मराठीकाका.

शिक्षणात स्वभाषेला प्राधान्य देऊन स्वत:ची प्रगती करून घेण्यात गुजरात देशात पहिल्या क्रमांकावर !


महाराष्ट्रातील अनेक थोर विचारवंत, नेते, शिक्षक, पाध्यापक इथे पालकांना इंग्रजी माध्यमाचा सल्ला देत असताना गुजरातने वेगळी वाट धरून मोठे यश मिळवले. 
१० विनान्तारचे विज्ञान शाखेतील उच्चशिक्षण मराठीत नाही, म्हणून १ली ते १० वी इंग्रजी माध्यमाच निवडले पाहिजे असा अशास्त्रीय, घातक सल्ला देणार्यांची संख्या महाराष्ट्रात वाढत असताना गुजरात राज्यातील नेते, कार्यकर्ते, शिक्षक आणि प्राध्यापक शांतपणे विज्ञान, तंत्रज्ञानातील उच्चशिक्षण गुजराती भाषेतून देण्यासाठी अथक परिश्रम करीत होते. या परिश्रमाला आता चांगली फळे आली आहेत.
गुजरात HSC बोर्डाच्या मार्च २०१५ मधील १२ विज्ञान शाखेच्या सर्व विषयांची लेखी परीक्षा १२५३१४ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील ८५२१९ विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि अन्य २२ ऐच्छिक विषयांची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा गुजराती भाषेतून दिली. महाराष्ट्रात physics, chemistry, mathematics, biology या इंग्रजी नावांनी ओळखले जाणारे आणि फक्त इंग्रजीतूनच शिकवले जाणारे हे आणि इतर विषय गुजरातमधील शेकडो शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात दैनंदिन स्वरुपात गुजरातीतून शिकवले जातात. गुजरात HSC बोर्डाने या सर्व विषयांची गुजराती भाषेतील पुस्तके देखील स्वत:हून छापली आहेत. 
११ वी, १२ वी विज्ञान ( महाराष्ट्रातील विद्वानांसाठी विशाखेचे नाव सायन्स नमूद करतो म्हणजे समजेल ) शाखेत हजारो विद्यार्थी गुजराती माध्यमातून शिकू लागल्यावर गुजरात सरकारने पुढील पावले देखील उचलली. गुजरात राज्यातील सर्व अभियांत्रिकी ( मराठी विद्वानांच्या दृष्टीने इंजिनिअरिंग) पदविका अभ्यासक्रमासाठी गुजराती माध्यम उपलब्ध आहे. फ्रेंच, जर्मन लोक जे जे अभ्यासक्रम आपल्या भाषेतून शिकवतात ते सर्व अभ्यासक्रम गुजरातीतून शिकवणे सहज शक्य आहे अशा दुर्दम्य आत्मविश्वासातून गुजरात सरकारने हे हाती घेतलेले काम तडीस नेले. ओषधनिर्माण (मराठी विद्वानांसाठी फार्मसी ) शाखेतील सर्वाधिक उद्योग गुजरातेत असल्याने गुजरात सरकारने हा अभ्यासक्रम गुजराती माध्यमातून शिकवण्याची व्यवस्था केली. सद्य देशातील सर्वात अधिक वैद्यकीय प्रतिनिधी ( मराठी विद्वानांसाठी मेडिकल रिप्रेझेंटेटिवज्) गुजराती माध्यमातून शिक्षण घेतलेले आहेत आणि इंग्रजी शरण मनोवृत्तीच्या असंख्य वैद्यकीय व्यावसायिकांना विविध औषधांची माहिती गुजरातीतून किंवा गुजरातीमिश्रित इंग्रजीतून देत आहेत. या प्रतिनिधीनी आपले बालवाडी ते पदवी / पदविका शिक्षण गुजराती माध्यमातून घेतल्याने त्यांच्या हातून काही भयानक वैद्यकीय चुका झाल्याचे गेल्या २५ वर्षात समोर आलेले नाही. मराठीतून वैद्यकीय, औषध निर्माण क्षेत्रातील शिक्षांचा विचार मांडला की अंगावर नाग चढल्यासारखे भयभीत होणारे मराठी विद्वान यातून काही बोध नक्की घेतील अशी मला खात्री आहे.
वरील अनेक विषय इंग्रजीतून शिकताना असंख्य विद्यार्थ्यांना केवळ पाठांतराचाच आधार घ्यावा लागतो पण तेच विद्यार्थी तेच विषय आणि तोच आशय गुजरातीतून शिकल्यास फारसे पाठांतर न करता विषय सखोल समजतात हा अनुभव आणि त्या दिशेने संशोधन झाल्याने गुजरातने प्रगतीचा मार्ग धरला.
महाराष्ट्रालाही हे शक्य आहे. इथे १९७७ पासून physics, chemistry, mathematics, biology या विषयांच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र HSC बो बोर्ड मराठीतून काढते फक्त महाराष्ट्रातील अतिरेकी इंग्रजीप्रेमी शिक्षक, प्राध्यापकांनी ही माहिती चक्क ३८ वर्षे आपापल्या विद्यार्थ्यांना सांगितली नाही, इतकेच ! गावोगावच्या महान मराठी शिक्षक, प्राध्यापक, पदवीधर, सुशिक्षित, अशिक्षित, साक्षर, निरक्षर अशा सर्वांनी आता ३८ वर्षांनंतर तरी ही माहिती सर्वत्र पोचवावी, हे आवाहन !
आपल्याकडेही मराठी विद्यार्थ्यांनी physics, chemistry, mathematics, biology विषयांचा अभ्यास इंग्रजीतून करताना त्याच विषयांच्या मराठी पुस्तकातून याच विषयांची एक उजळणी केली तर केवळ पोपटपंची न करता प्रत्यक्ष विषयाचे ज्ञान उपयोगात आणणारे विज्ञान पदवीधर महाराष्ट्रात वाढतील. 
- अनिल गोरे, मराठीकाका

ज्ञानोबा माउली तुकाराम !


या जयघोषाने मराठी माध्यमाची दिंडी जोरात चालली आहे. वाट चुकून इतर माध्यमात गेलेले अनेक वारकरी आता मराठी माध्यमाची पालखी उचलायला पुढे येत आहेत. इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यमाच्या पालखीला हात देणाऱ्या सर्व शहाण्या, सूज्ञ वारकऱ्यांचे अनुकरण अधिकाधिक मराठी भाषकांनी मनापासून करावे, हे आवाहन !
क] लहान शब्द
ख ] लहान वाक्ये
ग ] पूर्वपरिचित मराठी शब्दांच्या आधारे निर्माण झालेल्या नव्या, अर्थपूर्ण ( उच्चारताच अर्थ सूचित करणारे ) मराठी शब्दांची विपुलता
घ ] उपयोग, विनियोग, उद्देश, उगम, निर्मिती प्रक्रिया, निर्मिती पद्धत, निर्मिती करणारा अशा निकषांचा विचार करून वस्तू, भावना, संकल्पना, प्रणाली, रूढी याला स्वतंत्र मराठी नाव देण्याची, विद्वानांनी सुरु केलेली परंपरा
च ] मूळ मराठी शब्दांची जोडाक्षर विरहित, सोपी रचना
छ ] वाक्यातील अनेक शब्द मागेपुढे झाले तरीही बहुतेक बदलानंतर देखील वाक्यांचा अर्थ जसाचा तसा टिकून राहणे आणि अशा बदलानंतरही वाक्य व्याकरणदृष्ट्या वैध असणे, योग्य असणे
ज ] विभक्ती प्रत्यय या सोयीमुळे पूरक शब्दांचा कमी वापर करावा लागल्याने मोठा आशय कमी शब्दांत व्यक्त होण्याची सोय.
झ ] ॐ या एका बीजाक्षराच्या वेगवेगळ्या घटकातून ५२ मुळाक्षरे आणि दहा अंकांची निर्मिती
प ] जोडाक्षर सुविधेची जोड मिळाल्याने ५२ मुळाक्षरातील दोन ते सहा अक्षराच्या जोडकामाने ४४ अब्ज स्वतंत्र अक्षरचिन्हे होण्याची शक्यता आणि क्षमता !
फ ] ५२ मुळाक्षरांची ५२ स्थाने आणि हलंत म्हणजे पाय मोडण्याचे चिन्ह इतकी ५३ चिन्हे संगणक स्मृतीत असली की संगणक ४४ अब्ज आणि त्याहून अधिक स्वतंत्र देवनागरी जोडाक्षरचिन्हे समजून घेऊ शकतो आणि उमटवून दाखवू शकतो.
ब ] जगातील सर्वाधिक विषयांवर छापील पुस्तके असणारी एकमेव भाषा !
भ ] दरवर्षी नियमितपणे लाखोंच्या उपस्थितीत ज्या भाषेतील साहित्यासाठी साहित्य संमेलन भरते अशी एकमेव भाषा म्हणजे मराठी !
मराठीची ही वरील वैशिष्ट्ये आपण जर जगातील इतर भाषकांना सांगितली आणि पटवून दिली तर मराठी ही जगातील एक मुख्य संपर्क भाषा होईल. संज्ञापन ( communication ), भाषिक संवाद, संपर्क या कामासाठी जगातील सर्वांना लागणाऱ्या वेळात किमान ३० % ते कमाल ७० % बचत करून देण्याची क्षमता मराठीत आहे. हे पटवून दिले तर जगाची भाषिक बाजारपेठ मराठी व्यक्तींना अब्जावधीचे उत्पन्न मिळवून देईल.
ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा अमृताशी पैजा जिंकेल म्हणले त्यातील ' अमृत ' चा अर्थ अ - मृत म्हणजे मृत नसलेला थोडक्यात कोणताही जिवंत प्राणी असेल तर त्याला मराठी समजेल आणि अतिशय उपयुक्त ठरेल असा आहे. जगात ७३० कोटी अ - मृत मानवी जीव आहेत. त्या सर्वांना मराठीची ओळख, मराठी भाषेचे शिक्षण, प्रशिक्षण देणे हा आय टी सेवांपेक्षा अधिक रोजगार आणि अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय होईल. सर्वांनी याचा गंभीरपणे विचार करावा असे मला वाटते. - प्रा. अनिल गोरे, मराठीकाका

पालकांचे अनुभव

मागील वर्षी इंग्रजी माध्यमात आणि यावर्षी मराठी माध्यमात प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थी आणि पालकांचे अनुभव.
१) मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी झाल्याचे जाणवते. 
२) मागील वर्षापर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठीशी केले जाणारे शत्रुत्व पाहता मराठीची तोंडओळख पुरेशी झाली नसली तरीहि घरातील भाषा मराठी असल्याने विविध विषय मराठीतून अधिक चांगल्या प्रकारे समजत आहेत. 
३ ) मराठी लिखाणात समस्या जाणवतात पण समजावून दिल्यावर समजण्याचा वेग आश्चर्यकारक रीत्या चांगला आहे. 
४ ) इंग्रजी माध्यमात वापरत असलेल्या रोमन लिपीत स्वर, व्यंजने आणि जोडाक्षरे या सर्वच गोष्टींची भयानक टंचाई असल्याने जे उच्चार समजत नव्हते ते आता समजू लागले आहेत.
५) जोडाक्षराची तयारी करायला अधिक कष्ट घ्यावे लागतील पण ते एकदा नीट समजले की पुढील वर्षे अधिक सोयीची ठरतील असा विश्वास पालकांना वाटू लागला आहे.
६) इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यम निवडल्यावर केवळ तीन आठवड्यात इंग्रजी स्पेलिंग बंवाब्ताचे मुलांचे कौशल्य वाढले आणि इंग्रजी वाक्यरचना थोडीशी सुधारली तसेच अधिक सुधारण्याची अशा वाढली आहे.
मराठीकडे अत्यंत प्रगत देवनागरी लिपी आणि वाक्यरचनेचे सुसंगत नियम असल्याने मराठीत विचार करून इंग्रजी स्पेलिंग तसेच इंग्रजीतील वाक्य तयार करण्याची पद्धत आता मुलांच्या मनात रुजू लागल्याने ही सुधारणा दिसत असावी असे मला वाटते.
इंग्रजी चांगले यावे या स्वप्नासाठी ज्यांनी आपली मुले इंग्रजी माध्यमात घातकी असतील त्यांनी अजूनही विचार करून माध्यम बदलावे, इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यम स्वीकारावे आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे इंग्रजी सुधारण्यासाठी मुलांच्या इंग्रजी भाषा शिक्षणाचा उत्तम पाया रचावा असे मी सुचवतो. दुर्दैवाने इंग्रजी माध्यमातील मुलांना यापुढेही इंग्रजी माध्यमात ठेवले तर त्यांचे इंग्रजी अधिकाधिक बिघडण्याचा धोका लक्षात घेऊन पालकांनी सूज्ञ आणि शहाणपणाचा निर्णय घ्यावा आणि मराठी माध्यमाच्या शाळेत आजच प्रवेश घ्यावा. माध्यम बदलून मराठी माध्यमातील प्रवेशासाठी अडचण आल्यास आपापल्या भागातील शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र शासन या पदावरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,. आपल्या समस्या दूर होतील.
अनिल गोरे, मराठीकाका.

राज्यभरातून व्यसनमुक्तीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

........
............................
इंग्रजी माध्यमाचे व्यसन ज्या वेगाने पसरले त्याच वेगाने लोक त्या व्यसनाचा त्याग करू लागले आहेत.
इंग्रजी माध्यमाच्या व्यसनापोटी मुलांना इंग्रजी माध्यमात घातलेल्या अनेकांचे दोन तोटे झाले.
१ ] अनावश्यकरीत्या अफाट पैसा खर्च झाला हा अगदी छोटा आणि सहन करण्याजोगा असा पहिला तोटा झाला. या तोट्यातून सावरण्यासाठी घरबांधणी, घरदुरुस्ती पुढे ढकलणे, दागिने खरेदी बंद करणे, सण समारंभ साजरे करताना खर्च अत्यंत कमी करणे हे उपाय उपयुक्त ठरतात. त्याने भागले नाही तर इंग्रजी माध्यम शाळांची भूक भागवायला कर्ज काढणे, जमीन विकणे इ. सर्वसामान्य उपाय करून कसेतरी हि बकासुरी भूक देखील भागवता येते.
आर्थिक ओढताणीपेक्षा दुसरा एक मोठा तोटा मात्र पूर्वी लक्षात येत नव्हता तो आता पालकांच्या लक्षात येऊ लागला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शेतमजुरापेक्षा कमी पगारावर राबणारा / राबणारी व्यक्ती शिक्षक पदासाठी पात्र असलेले शिक्षण घेतलेली असेल याची खात्री नव्हती.
२] इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये शेतमजुरापेक्षा कमी पगारावर भरती केलेले कमी पात्रतेचे शिक्षक, अनेक शिक्षक मुलांना विविध विषय नीट समजावून देऊ शकले नाहीत. इंग्रजी माध्यमातील मुलांचे इंग्रजी व्याकरण मराठी माध्यमातील मुलांपेक्षा कच्चे असल्याचे अनेक पालकांना जाणवले. अनेक इंग्रजी माध्यम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मनात गणित आणि विज्ञान विषयाची भितीच निर्माण झाली. विज्ञान शाखेतील पुढील शिक्षण इंग्रजीतूनच असते असा भ्रम पसरलेला असल्याने ज्यांनी मुले आवर्जून इंग्रजी माध्यमात घातली त्या पालकांपैकी अनेकांची मुले ११ वी पासून विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायला नकार देऊ लागली. इंग्रजी माध्यमाच्या अंगभूत त्रुटींमुळे त्यांच्या मुलांच्या मनात गणित, विज्ञान विषयांची भिती निर्माण झाल्याने अशा अनेक मुलांनी शाळेच्या पुढील शिक्षणात विज्ञान शाखा टाळायला सुरुवात केली. सरकारला डॉक्टर मिळेनात आणि यावर्षी महाराष्ट्रात इंजिनिअरिंग च्या एक लाख साथ हजार जागा प्रवेशासाठी उपलाभ्ध असताना त्या जागांसाठी जेमतेम पन्नास हजार अर्ज आले आहेत आणि त्यापैकी फक्त पस्तीस हजार विद्यार्थी प्रवेश घेतील असा अंदाज आहे.
इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजीच्या घातक व्यसनामुळे असे नुकसान होईल हे मी गेली २५ वर्षे सांगत असताना कोणी लक्ष दिले नाही पण आता परिणाम थेट घराघरात पोचला असल्याने लोक स्वत:च अनुभव घेऊन शहाणे होत आहेत याचा मला खूप आनंद होतो आहे.
जी मुले मराठी माध्यमातून शिकली त्यांना गणित, विज्ञानाची अशी भिती वाटत नाही आणि १० वी नंतरचे विज्ञान शिक्षण इंग्रजीतून घेतानाही इंग्रजी व्याकरण पक्के असल्याने १० वी पर्यंत मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी स्पर्धेत सरस ठरतात, हे प्रथम अनेक मराठी माध्यम शाळांमधील शिक्षकांच्या लक्षात आले. अशा अनेक शिक्षकांनी आपली मुले इंग्रजी माध्यम शाळेतून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत घातली. अनेक सूज्ञ पालकांच्याही हीबाब लक्षात आल्याने गावोगावी पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून काढून मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये स्थलांतरित करीत आहेत. धुळे ते कोल्हापूर आणि मुंबई ते नागपूर अशा संपूर्ण महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात मुले स्थानांतरीत करण्याची ही भावना पालकांच्या मनात आढळते. अशी इच्छा खरेतर दरवर्षी अनेक पालकांच्या मनात येत होतीच पण सुरुवात कोणी करायची असा प्रश्न होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सुमारे ३०० हून अधिक पालकांनी असा निर्णय घेतल्याने राज्याच्या इतर भागात देखील ही प्रक्रिया जोर धरू लागली.
व्यसनमुक्तीच्या या प्रवाहाची व्याप्ती आणि वेग वाढावा अशी अपेक्षा !
सर्व मराठीप्रेमींनी नवतरुण पालक आणि इंग्रजी माध्यमातील ७ वी पर्यंत इयत्तेतील मुलांच्या पालकांना या सर्व बाबी समजावून द्याव्यात. इंग्रजी भाषा नीट यावी तसेच इतर विषयांची समज सुधारावी म्हणून मराठी माध्यमाच्या तुकडीत प्रवेश घेण्यासाठी आणि सेमी इंग्रजी हा वाईट तसेच घातक पर्याय निवडू नये यासाठी पालकांना पालकांना प्रवृत्त करावे, असे मी आवाहन करतो. यावर्षी महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात किमान १०० ते कमाल ५०० या संख्येने व्यसनमुक्तीची ( इंग्रजी माध्यमाचे व्यसन सुटल्याची ) अशी उदाहरणे आढळली आहेत. हा वेग वाढवा, यासाठी अधिकाधिक लोकांनी प्रयत्न करावेत, असे मी सुचवतो.
अनिल गोरे, मराठीकाका.

११ वी विज्ञान मराठी ची तुकडी फर्ग्युसन मध्ये

महाराष्ट्र राज्यात पुणे शहरातील फर्गसन कनिष्ठ महाविद्यालयाला जशी '' ११ वी १२ वी विज्ञान शाखेची ' मराठी माध्यम तुकडीला '' शिक्षण उपसंचालक पुणे विभाग यांनी मान्यता दिली तशी अजून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना दिलेली नाही.
असे असले तरी मान्यताप्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र physics, रसायनशास्त्र chemistry, गणित mathematics, जीवशास्त्र biology हे विषय फक्त इंग्रजीतून शिकवत असताना घरी मराठीतून अभ्यास करण्यास कोणतीही कायदेशीर बंदी नाही. या विषयांचा अभ्यास मराठीतून केल्यास दंड किंवा शिक्षा सुचवणारा कायदा अद्याप महाराष्ट्रात संमत झालेला अनही.
मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी अशा तिन्ही माध्यमातून आणि विविध सत्र बोर्डांच्या परीक्षा देऊन १० वी झालेल्या ज्यांना कोणाला मराठी लिहिता वाचता येते त्यांनी वरील विषयांचा अभ्यास इंग्रजीतून करतानाच एकदा मराठीतून देखील सर्व अभ्यास पुन्हा करावा. वरील विषय अधिक खोलवर समजण्यास विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल.
वरील विषय केवळ इंग्रजीतून शिकलेले विद्यार्थी आणखी उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतात तेव्हाचा अनुभव अतिशय बोलका आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल आणि अन्य शास्त्रीय, तांत्रिक अभ्यासक्रमांच्या उच्चशिक्षणात प्रत्येक परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणार्यांची संख्या केवळ २० % ते ३० % आढळते, त्यातही पहिल्या वर्गात उत्तीर्ण होणारे २ ते ३ % च आढळतात.
ही निराशाजनक परिस्थिती बदलायची असेल तर किमान १२ वी पर्यंत वरील विषयांचा अभ्यास इंग्रजीसह किंवा इंग्रजीशिवाय मराठीतून अवश्य करावा, असे मी सुचवतो. लहानपणी इंग्रजी माध्यमात शिक्षणाला सुरुवात केल्याने काहींना मराठी वाचता येत नसेल तर मराठी शिकावी आणि आपली प्रगती साधायला वरील विषयांची मराठी पुस्तके वाचावीत अशी मी शिफारस करतो.
मराठी शिकणे अगदीच शक्य नसेल तर किमान फ्रेंच आणि जर्मन या दोन भाषा शिकाव्यात आणि त्या भाषेतील वरील विषयांची पुस्तके वाचावीत. वरील विषय मराठीतून जितके चांगले कळतात त्याचप्रमाणे फ्रेंच आणि जर्मन मधून देखील बऱ्यापैकी समजतात.
जो इंग्रजीवरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला.
असे कोणीतरी म्हणले आहे ते लक्षात ठेवावे, हे आवाहन !
- अनिल गोरे, मराठीकाका.

७ जून ते १२ जून समुपदेशन आठवडा !


मागासलेली इंग्रजी भाषा आणि दरिद्री रोमन लिपी या दोन निकृष्ट साधनांच्या आधारे आपल्या मुलांना संपूर्ण शालेय शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने आपली मुले स्पर्धेत मागे पडत असल्याची जाणीव होत असलेल्या पालकांसाठी ७ जून ते १२ जून या कालावधीत इंग्रजी माध्यमाच्या सापळ्यातून सुटका कशी करून घ्यावी याबाबत रोज सायंकाळी ५ ते ७ या वेळात आईबाबांचे पुढील दोन मुद्द्यांवर समुपदेशन केले जाईल. इच्छुक पालकांनी संपर्क साधावा.
मुद्दा १ ] इंग्रजी माध्यम सोडून देऊन मराठी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालणे
मुद्दा २ ] सामाजिक दबावामुळे इंग्रजी माध्यम सोडायचे नसेल त्यांनी इंग्रजी माध्यमामुळे होणारे भयानक नुकसान टाळण्यासाठी मराठी माध्यमाची पुस्तके, मराठी माध्यमात शिकवणाऱ्या म्हणजे स्वत: ' पुरेसे शिकलेल्या ' आणि नियमित प्रशिक्षण मिळणाऱ्या पात्र तसेच अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आपल्या मुलांसाठी मिळवणे.
इच्छुक पालकांनी समुपदेशनासाठी तातडीने संपर्क साधून भेटवेळ ठरवावी, हे आवाहन
अनिल गोरे, मराठीकाका

नव्या शैक्षणिक वर्षाची अत्यंत आनंददायी सुरुवात !


वडगाव मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र, भारत या गावातील
"माधव स्मृती" व्यक्ती विकास संस्था
या संस्थेत दि. २४ / ०५/ २०१५ या दिवशी माझे भाषण झाले.
आकलन आणि अभिव्यक्तीसाठी इंग्रजीच्या तुलनेत मराठीत अधिक प्रमाणात असलेल्या सोयी , कोणताही आशय मराठीतून वाचताना, लिहिताना, समजावून घेताना होणारी बालकांच्या वेळेची ६० % ते ७० % बचत, मराठी माध्यमाच्या शाळांतील मुलांचे आणि मुलींचे इंग्रजी भाषाविषयक कौशल्य ( स्पेलिंग अचूकता, व्याकरण, वाक्यनिर्मिती इ. ) इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने अधिक चांगले असल्याचे आढळलेले गेल्या दीडशे वर्षातील सत्य, गेल्या साठ वर्षात सर्व स्पर्धा परीक्षांत मराठी माध्यमाच्या मुलांना सातत्याने मिळालेले अतिशय लक्षवेधी आणि उत्तुंग यश या सर्व बाबी मी त्या भाषणात उलगडून सांगितल्या.
त्या भाषणाला हजार असणार्या सौ. हर्षदा दुबे आणि त्यांचे पती यांनी गेले काही दिवस याबाबतीत घरी विचारविनिमय केला आणि पूर्ण विचारांती,
एका इंग्रजी माध्यम शाळेत शिकणाऱ्या आपल्या ज्युनिअर के. जी. उत्तीर्ण मुलाचे शालेय शिक्षणासाठीचे भाषा माध्यम बदलून त्याला तळेगाव दाभाडे येथील सरस्वती मंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला असून ते आज त्या शाळेत प्रवेशासाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत.
हा निर्णय घेताना या दाम्पत्याने मराठी शाळा स्वस्त आणि इंग्रजी शाळा महाग असा विचार केला नसून मराठी शाळेतून मुलाचे इंग्रजीविषयक कोशल्य अधिक चांगले विकसित होऊ शकेल शिवाय इतर सर्व विषय मराठीतून शिकल्याने मुलाला ते विषय अधिक चांगले शिकता येतील या लाखोंच्या अनुभवसिद्ध आणि रास्त अपेक्षेने हा माध्यम बदलाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाबद्दल दुबे दाम्पत्याचे अभिनंदन आणि चि. दुबे याला मोठ्या यशासाठी शुभेच्छा !
माझी भाषणे अधिकाधिक ठिकाणी आयोजित करावीत असे आवाहन !
- अनिल गोरे, मराठीकाका.

प्रत्येक जिल्ह्यात एक माध्यमांतर दूत निर्माण व्हायला हवा.


इंग्रजी माध्यम हे केवळ महाराष्ट्राचे दुर्दैव नव्हे तर हे मानवतेवरील संकट आहे. इंग्रजी ही सुनियोजित पद्धतीने विकसित झालेली भाषा नसून अडाणी, अशिक्षित समुद्री चोरांनी 
अंदाधुंद रीतीने गोळा केलेल्या शब्दांचा एक संग्रह हे इंग्रजीचे मुळ स्वरूप आहे. फ्रेंच आणि लातिन मधील प्रत्येकी २९ % टक्के शब्द, जर्मन मधील २६ टक्के शब्द आणि जर्मन आधारित भाषांमधून १० टक्के शब्द यानुसार ८४ टक्के शब्द युरोपातून आणि उरलेले सर्वच शब्द जगातील ४००० भाषांमधून उचलेगिरीच्या एकाच तत्वावर जमा केल्यामुळे इंग्रजी म्हणून जे काही वापरायचे त्याबाबत इंग्रज आणि बिगर इंग्रज अशा सर्वांची मोठी गोची झालेली आढळते.
चोरलेल्या शब्दांच्या जोडीला फक्त पाच स्वर आणि केवळ १९ व्यंजने असलेली रोमन लिपी इंग्रजीशी जोडली गेल्याने इंग्रजीचा वापर करणाऱ्या आणि करू पाहणाऱ्या मानवी जीवांच्या हालात भरच पडली आहे. रोमन लिपीच्या कुप्रभावाने उच्चार आणि लेखनात जितक्या विसंगती निर्माण होतात तितक्या जगातील इतर कोणत्याही अन्य लिपीच्या प्रभावाने होत नसाव्यात.
इंग्रजी वाक्य असल्याच्या गैरसमजाने जगातील कोणीही जी वाक्ये वाचतात, लिहितात ती वाक्ये म्हणजे विविध भाषांमधील शब्दांचे एक अनाकलनीय मिश्रण ठरते. एका वाक्यातील शब्द इंग्रजांनी ज्या विविध भाषांमधून चोरले त्या मुल भाषेच्या भाषिकांना उच्चारताच चटकन समजतात पण इतरांना ते समजण्यास अधिक वेळ, अधिक कष्ट करावे लागतात. अनेक इंग्रजी वाक्यातील प्रत्येक शब्द इंग्रजांनी वेगळ्या भाषेतून चोरलेला असल्याने प्रत्येक शब्द ओलांडून जाताना एक अडथळा याप्रमाणे इंगजी वाक्य समजून घेण्यासाठी त्या वाक्यात जितके शब्द असतील तितक्या अडथळ्यांची मालिका समोर असते.
असो, भारतातील मागील काही पिढ्यांनी अनेक अनावश्यक ठिकाणी अशी मागासलेली इंग्रजी आणि तिच्यासोबत दरिद्री रोमन लिपी वापरण्याची वाईट सवय जोपासली होती. या सवयीचा उगम भारत देशातील महाराष्ट्र राज्यात असलेल्या पुणे शहरातील लकडी पूल ते दारूवाला पूल या भागातील अनेक कारकुनांनी केला. १९८० पर्यंत भारताचा कारभार प्रामुख्याने कारकुनांच्या हातात असल्याने ही कारकुनी भाषा शिक्षणात अकारण महत्वाचे स्थान मिळवून बसली. गेल्या दीडशे वर्षात वाक्ये जुळवून कसेबसे इंग्रजी बोलणारे वाढले, इंग्रजी माध्यम शाळा वाढल्या आणि त्याचा परिहार्य परिणाम म्हणून किमान सर्वसाधारण गुणवत्ता मात्र घसरू लागली.
ही घसरलेली किमान गुणवत्ता पुन्हा वाढवण्यासाठी शिक्षणात आणि अन्य व्यवहारात इंग्रजीचा वापर शक्य तितका टाळायला हवा. शालेय शिक्षणातील इंग्रजीचे अवास्तव महत्व नष्ट झाल्याशिवाय गुणवत्ता वाढणार नाही. या सर्व प्रक्रियेची पहिली पायरी म्हणून महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यम शाळांच्या माध्यमात परिवर्तन केले पाहिजे. या सर्व इंग्रजी माध्यम शाळांचे रुपांतर अगोदर निम मराठी माध्यमात करायला हवे आणि नंतर त्यांचे रुपांतर पूर्णपणे मराठी माध्यम शाळेत करायला हवे. अशा मराठी माध्यम शाळांमध्ये इंग्रजी भाषा विषय सक्तीचा न ठेवता ऐच्छिक ठ्वायला हवा. दीडशे वर्षांच्या आत्मग्लानीतून भारतीयांना आणि इंग्रजांनाही ( १८६० पासून इंग्लंडमध्ये इंग्रजी या मागासलेल्या भाषेतून शिक्षण घेण्याचा प्रघात वाढला. त्यापूर्वी ते अन्य चांगल्या भाषेतून शिक्षण देत आणि घेत होते. ) बाहेर काढले पाहिजे. १८६० पासून इंग्लंडमधील शिक्षणाचा दर्जाही घसरला.
या माध्यमांतर मोहिमेसाठी प्रथम महाराष्ट्रात प्रयत्न करून हळूहळू ही मोहीम पुढे भारतभर आणि शेवटी इंग्लंडपर्यंत न्यायची आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक माध्यमांतर दूत हवा. जे कोणी यासाठी काम करू इच्छितात त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
अनिल गोरे, मराठीकाका ९४२२००१६७१

आनंदाची बातमी !


येत्या जून महिन्यापासून पुणे महानगरपालिकेने सुरु केलेल्या सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून त्या शाळांचे रुपांतर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये करणार !
काही काळ या शाळा इंग्रजी माध्यमाच्या होत्या त्या काळात त्या शाळांमधील ज्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषा आणि इंग्रजी व्याकरणाचे अतोनात नुकसान झाले अशा विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी त्यांना प्रथम मराठीची उत्तम ओळख करून द्यावी. ज्यांचे मराठी चांगले आहे त्यांचे इंग्रजी लवकर सुधारते असा अनुभव लाखो जणांना आहे. इंग्रजीचा हव्यास पुरा करण्यासाठी पायाभूत भाषिक कौशल्य म्हणून मराठीची उत्तम तयारी करवून घेण्यासाठी आता पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समितीत मी प्रस्ताव ठेवणार आहे.
जगातील कोणत्याही महानगरपालिकेत भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र समिती, २०१५ - १६ साठी ७७ लाखाची अंदाजपत्रकी तरतूद, स्वतंत्र कार्यालय, स्वतंत्र कर्मचारी अशी व्यवस्था नाही. या मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका, समितीचा सदस्य या नात्याने मी इंग्रजी सुधारण्यासाठी मराठीचे उत्तम प्रशिक्षण हा कार्यक्रम सुचवणार असून हा कार्यक्रम अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी फेसबुक्का लावून मन:पूर्वक टंकन करणाऱ्या मराठीप्रेमींनी आपल्या सूचना प्रतिक्रियेच्या रुपात कळवाव्यात असे आवाहन !
इंग्रजी माध्यम हा हलक्या दर्जाचा पर्याय स्वीकारल्याने इंग्रजीची जि वाईट अवस्था झाली आहे त्या अवस्थेतून मार्ग काढायला जगातील पहिली नागरी भाषा असलेली मराठी अत्यंत उपयुक्त ठरेल या विश्वासाने हा कार्यक्रम सुचवला आहे. महाराष्ट्रात इतरत्र देखील हा प्रयोग करून पहावा असे मी सुचवतो.
परप्रांतात असलेल्या पालकांनीही आमच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची मराठी पाठ्यपुस्तके संगणकावर उतरवून घेण्यास विनामुल्य उपलब्ध असल्याने त्याचा लाभ घ्यावा. सर्व विषय अगोदर मराठीतून शिकून नंतर हवेतर शाळेच्या माध्यमानुसार इतर भाषेतून देखील उजळणी करावी हा अभ्यासाचा एक प्रभावी मार्ग आहे. जगातील कोणालाही हा उत्तम मार्ग उपलब्ध असून प्रयोग करून पहावा आणि अनुभव कळवावा हे आवाहन ! अनिल गोरे, मराठीकाका.

हिंदू धर्मीय अधिक श्रीमंत

वॉशिंग्टन - जगातील प्रख्यात प्यू रिसर्च संस्थेने अमेरिकेतील अन्य धर्मियांपेक्षा हिंदु आणि ज्यू धर्मीय अधिक श्रीमंत आणि शिक्षित आहेत, असा निष्कर्ष काढला.
१. अमेरिकेतील हिंदु धर्मियांपैकी ७७ टक्के, तर ज्यू धर्मियांपैकी ५९ टक्के नागरिक पदवीधर आहेत. 
अमेरिकेच्या उर्वरित लोकसंख्येपैकी केवळ २७ टक्केच पदवीधर आहेत. 
२. उत्पन्नाच्या बाबतीतही हिंदु आणि ज्यू धर्मियांतील अनुक्रमे ३६ आणि ४४ टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न ६४ लाखहून अधिक आहे. 
या उलट उर्वरित लोकसंख्येपैकी केवळ १९ टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न ६४ लाखहून अधिक आहे.
हिंदूंच्या मनातील विचार एखाद्या प्रगत, समृद्ध, संपन्न भारतीय भाषेच्या ( बहुतांश लोकांच्या बाबतीत मराठी ) सबळ माध्यमातून होतो. त्यामुळे विषय चटकन समजतो, निर्णय वेगाने घेता येतात.
मागासलेल्या इंग्रजीवर आणि दरिद्री रोमन लिपीवर शंभर टक्के आपले जीवन अवलंबून ठेवणारे लोक अगदी अमेरिकेत देखील प्रगत भाषेचा परिचय असलेल्यांच्या तुलनेत मागे पडतात. जगातील पहिली नागरी भाषा असलेल्या मराठीचा परिचय अमेरिकेला करून दिला अमेरिकेत मराठीला महत्व मिळेल आणि नंतर भारतातील, महाराष्ट्रातील आणि विशेषत: पुण्यातील अनेक पदवीधर अशिक्षित लोक आपले पूर्वीचे प्रतिपादन विसरून मराठी किती महत्वाची आहे याबाबत खडे बोल सुनावू लागतील अशी मला खात्री वाटते. - अनिल गोरे, मराठीकाका.

आपल्या लाडक्या मुलांचे शिक्षण अधिक सुलभ, सकस आणि सोपे करण्याचा निर्धार. !


दि. २६ / ०५ / २०१५ या दिवशी सोयीची वेळ ठरवून सहा उच्चशिक्षित जोडपी माझ्या भेटीला आली. या सर्वांच्या मुलांना जून २०१६ पासून प्रचलित औपचारिक शिक्षणासाठी शाळा निवडायची आहे. महापालिकेच्या शाळेतील विनामुल्य दर्जेदार शिक्षणापासून वार्षिक १३ लाख रुपये भरून शिक्षण देण्याचा देखावा करणाऱ्या तथाकथित आंतरराष्ट्रीय शाळांपर्यंत कोणत्याही शाळेची आर्थिक भूक भागवण्याची क्षमता असलेली ही जोडपी आहेत.
शाळा निवडीबाबत सल्ला देण्याची विनंती त्यांनी मला केली म्हणून कालची भेट ठरली होती. या भेटीपूर्वी सर्वांचा विचार जमेल त्या इंग्रजी माध्यम शाळेत मुलांना घालण्याचा होता.
महाराष्ट्रातील शिक्षणासाठी तीन प्रमुख भाषा माध्यमे इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम आणि मराठी माध्यम ही आहेत, याची माहिती देऊन मी त्यांना या माध्यमांची पुढील सद्यस्थिती सांगितली.
मराठी माध्यम या प्रकारातील शाळांपैकी ९९.६४ % शाळा सरकारी अनुदानित आहेत आणि त्या शाळांमधील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार भरपूर वेतन मिळते, म्हणून शिक्षक पदासाठी आवश्यक पूर्ण पात्रता असलेल्या व्यक्ती अशा शाळांमध्ये नोकरी मिळवण्यास धडपडतात. या सर्व शाळांमधील अभ्यासक्रम सामाईक असतो, शिकवण्याची पद्धत जवळपास सारखी असते. अनुदानित मराठी माध्यम शाळांमधील शिक्षकांना कामावर असतानाच कसे शिकवावे, कालानुरूप कोणते बदल करावे याचे नियमित प्रशिक्षण मिळते. या शिक्षकांना नोकरीची शाश्वती असते, गंभीर आजारात वैद्यकीय सेवा विनामूल्य मिळते. विविध सोयी सुविधा मिळत असल्याने या शाळांमधील शिक्षक दीर्घकाळ शिक्षकी पेशात असतात, विद्यार्थ्यांचे वर्तन, समज क्षमता यांचा दांडगा अनुभव अशा शाळांमधील शिक्षकांना असतो. या शाळांमधील विद्यार्थी १० वी, १२ वी, पदवी, स्पर्धा परीक्षा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षा अशा सर्व ठिकाणी मोठे यश मिळवतात. परीक्षेचे भाषा माध्यम अमराठी असले तरी मराठीतून विषय उत्तम कळलेले असल्याने अमराठी भाषेतून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अमराठी भाषेतून देतानाही या शाळांमधील विद्यार्थी आघाडीवर असतात. या शाळांमध्ये शिक्षक पालक संवाद सहजसाध्य असतो. शाळा सुरु असलेल्या वेळात पालक कधीही शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना सोयीची वेळ ठरवून भेटू शकतात.
उर्दू माध्यमातील शाळांची स्थिती मराठी माध्यमाप्रमाणेच आहे.
इंग्रजी माध्यम शाळांची स्थिती मात्र वेगळी आहे.
माध्यम माध्यम या प्रकारातील शाळांपैकी ९८. २३ % शाळा विना अनुदानित आहेत आणि त्या शाळांमधील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन मिळत नाही, म्हणून शिक्षक पदासाठी आवश्यक पूर्ण पात्रता असलेल्या व्यक्ती अशा शाळांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आवेदनच पाठवत नाहीत. ज्यांची पात्रता आवश्यक पात्रतेपेक्षा वेगळी किंवा कमी आहे अशा व्यक्ती शिक्षक म्हणून नेमणे या शाळांना नाईलाजाने भाग पडते. या सर्व शाळांमधील अभ्यासक्रम सामाईक असेल याची खात्री नसते. शिकवण्याची पद्धत शाळांनुसार बदलते, कारण अशा शाळा चालविणाऱ्या संस्थांची बहुधा एकच शाळा असते आणि इतर शाळांशी कोणतेही शैक्षणिक आदान प्रदान होत नाही. विनाअनुदानित इंग्रजी माध्यम शाळांमधील शिक्षकांना कामावर असताना कसे शिकवावे, कालानुरूप कोणते बदल करावे याचे नियमित प्रशिक्षण मिळू शकत नाही. पालकांनी दिलेले भरघोस शुल्क वेतनासाठीच पुरात नाही, त्यामुळे महागडे प्रशिक्षण शक्यच नसते. या शाळांतील शिक्षकांना नोकरीची शाश्वती नसते, गंभीर आजारात वैद्यकीय सेवा विनामूल्य मिळत नाही. विविध सोयी सुविधा मिळत नसल्याने या शाळांमधील शिक्षक दीर्घकाळ शिक्षकी पेशात राहत नाहीत तर कायम दुसरा रोजगार मिळवण्याच्या शोधात असतात त्यामुळे अशा अनेक शाळांमध्ये एक विद्यार्थी एकच विषय एकाच वर्षात तीन चार वेगळ्या आणि अननुभवी अशा नव्या शिक्षकाकडून शिकतो. विद्यार्थ्यांचे वर्तन, समज क्षमता यांचा अनुभव अशा शाळांमधील शिक्षकांना कमी असतो, कारण मुळात अशा शाळांमध्ये दीर्घकाळ शिकवणारे शिक्षक फारसे नसतात. इतर चांगला रोजगार मिळेपर्यंत स्वत:ची तात्पुरती सोय म्हणून शिक्षकाचा अभिनय करणाऱ्यांची संख्या इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मोठी असते. या शाळांमधील विद्यार्थी १० वी, १२ वी, पदवी, स्पर्धा परीक्षा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षा अशा सर्व ठिकाणी फारसे मोठे यश मिळवत नाहीत. परीक्षेचे भाषा माध्यम इग्रजी असलेल्या परीक्षांत देखील हे विद्यार्थी बरेच मागे पडतात. इंग्लंडपासून कडेगाव बुद्रुक जि.. भंडारा पर्यंत सर्वत्र इंग्रजीतून विषय उत्तम प्रकारे कळण्याचे प्रमाणच मुळात फार कमी असल्याने इंग्रजीतून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे इंग्रजीतून देतानाही या शाळांमधील विद्यार्थी मागे पडतात. या शाळांमध्ये पालक शिक्षक संवाद सहजसाध्य नसतो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शाळेत शिक्षणाची नेमकी स्थिती काय आहे हे पालकांना कळू नये यासाठी काही खास उपाय केले जातात. 
उपाय १ ] बहुसंख्य पालक मराठी असल्यास मुख्याध्यापक आवर्जून अमराठी निवडला जातो जेणेकरून सहज संवाद होणार नाही. 
उपाय २ ] ज्या दिवशी ज्या वेळी फारसे पालक मोकळे नसतील असा दिवस आणि अशी वेळ पालकांच्या भेटीसाठी उपलब्ध करून देणे उदा. बुधवार ११ ते १२ ( पालकांच्या पोटापाण्याच्या कामकाजाची वेळ )
असो, कालच्या आमच्या चर्चेनंतर सहापैकी चार जोडप्यांनी आपल्या मुलांसाठी मराठी माध्यमाची शाळा निवडण्याचा निर्णय घेतला बाकीच्या दोन जोडप्यांचा निर्णय अजून व्हायचा आहे पण तेही मराठी माध्यम निवडतील अशी माझी अपेक्षा आहे. - अनिल गोरे, मराठीकाका

इतरांचे जगणे अधिक सोपे करण्याचा निर्धार !


महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ गावातील माधव सेवा संघ या संस्थेच्या सभागृहात दि. २४ / ०५ / २०१५ या दिवशी माझे सव्वा तासाचे व्याख्यान झाले. " इंग्रजी नावाच्या वेळखाऊ, मानवी स्वभावाशी विसंगत भाषेतून जीवनातील बहुसंख्य व्यवहार करण्याऐवजी तेच व्यवहार मराठी या जगातील पहिल्या नागरी भाषेतून केले तर वेळ वाचतो, आशय कमी कष्टात समजावून घेणे आणि अधिक काळ लक्षात राहणे अधिक सोपे होते, लिखाणाचे कष्ट कमी होतात आणि त्यामुळे एकूण आयुष्याची कार्यक्षमता वाढते " हे माझे बोलणे अनेक श्रोत्यांना पटले.
ज्यांच्या घरातील मुले इंग्रजी माध्यम शाळेत आहेत अशा अनेक श्रोत्यांनी आपल्या घरातील मुले ज्या इयत्तेत आहेत त्या इयत्तेची आणि त्यापूर्वीच्या सर्व इयत्तांची मराठी माध्यमाची पुस्तके घरी आणून सर्व विषयांचा समांतर अभ्यास मराठीतून करून घेण्याचा विचार बोलून दाखवला. उपस्थित सर्वांनी यापुढे आपले धनादेश मराठी या वेगवान भाषेतून, कमी अक्षरांत लिहिण्याचा आणि मिळणारे धनादेश मराठीतून मागण्याचा संकल्प सोडला.
मराठीतून धनादेश लिहिल्याने अक्षरी रकमेसाठी रोमन लिपीतील इंग्रजी मजकुराच्या तुलनेत ७० % कमी अक्षरे लिहावी लागतात. एका धनादेशाचा वापर होताना अक्षरी रक्कम तीनवेळा लिहिली जाते आणि आठवेळा वाचली जाते. मराठीचा वापर केल्याने होणारी वेळेची बचत ही काळाची गरज असून त्यामुळे धनादेश देणारा, घेणारा आणि अधिकोशातील तसेच अन्य कर्मचारी यांचा प्रचंड वेळ वाचेल.
असो, भारतातील कोणताही अधिकोष ( बँक ) मराठीतील धनादेश नाकारण्याची भूमिका घेत नाही पण एखादा अडाणी / अज्ञानी अधिकारी मराठी लिखाणाबाबत नापसंती दर्शवू शकेल. असा एखादा अडाणी / अज्ञानी अधिकारी कोठे समोर आला तर मात्र कृपया मला कळवावे. आपण त्याचे विविध मार्गांनी साकारी नियम दाखवून प्रबोधन करू ! - अनिल गोरे, मराठीकाका.

इंग्रजी माध्यमाचे शुल्क वाढवा

सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आता जे शुल्क आहे त्याशिवाय आणखी किमान पाचपट शुल्क वाढवले पाहिजे तरच त्या शाळा मराठी माध्यम शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण देऊ शकतील. सर्व मराठीप्रेमी समूहाने इंग्रजी माध्यम शाळांमधील पाचपट( ५००% ) शुल्कवाढीला पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. असे वाढीव शुल्क भरताना पालक कर्जबाजारी झाले आणि शिवाय धड शिक्षण मिळाले नाही तरच पालक स्वानुभवाने शहाणे होऊन दर्जेदार अशा मराठी माध्यमाकडे वळतील. मराठीप्रेमी समूहातील सर्वांनी कृपया इंग्रजी माध्यम शाळांमधील शुल्कवाढीबाबत टीका करणे थांबवावे असे मी आवाहन करतो. त्या शाळा जितक्या मोठ्या प्रमाणात आणि जितक्या वेगाने शुल्क वाढवतील तितक्या वेगाने त्या शाळा सोडून मराठी माध्यमाकडे येणारे विद्यार्थी वाढतील. इंग्रजी माध्यम शाळांमधील पाच टक्के विद्यार्थी कमी झाले तर त्यांना पुन्हा ७ % शुल्कवाढ करावी लागेल. १० % विद्यार्थी कमी झाले तर पुन्हा १५ % शुल्कवाढ करावी लागेल.
आत्ताच्या शुल्कात महाराष्ट्र किंवा भारतातील एकही इंग्रजी माध्यम शाळा दर्जेदार शिक्षण देऊ शकत नाही, कारण या शुल्कातून शिक्षकांना अतिशय कमी वेतन देता येते. कमी वेतनामुळे कमी पात्रतेचे शिक्षक नेमावे लागतात म्हणून १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, आय आय टी, एनडीए, बँक भारती, रेल्वे भारती, युपीएससी, एमपी एस सी, पोलीस भारती, लष्कर भारती, परदेशी जाण्यासाठी आवश्यक जी आर ई, टोफेल या खास इंग्रजी भाषा विषयक परीक्षांत देखील इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी मागे असतात.
या कमतरतेवर मात करण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या गल्लीबोळातील शाळा सध्या जितके शुल्क घेतात त्याच्या किमान सहापट किंवा त्याहून अधिक शुल्क त्यांनी घेणे योग्य ठरेल. एकतर इतके भरमसाठ शुल्क देणे किंवा मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मराठी माध्यम शाळा निवडणे असे दोनच पर्याय पालकांपुढे आहेत.
मराठी माध्यम, मराठी भाषा आणि मराठी माणसे यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी इंग्रजी माध्यम शाळांची प्रचंड शुल्कवाढ अतिशय आवश्यक आहे. मराठीवर मनापासून प्रेम करणाऱ्यांनी
" चला, इंग्रजी शाळांचे शुल्क वाढवू या ! "
नावाचा एक नवीन समूह स्थापन केला पाहिजे. जगातील कोणाचेही अपार शैक्षणिक नुकसान करणारे इंग्रजी माध्यम जगातून नष्ट होण्यासाठी अशी शुल्कवाढ चळवळ अतिशय आवश्यक आहे. - अनिल गोरे, मराठीकाका.

वर्धा जिल्ह्यात विशेष माध्यमांतर !


स्वत:कडे शिक्षक पदासाठी आवश्यक पूर्ण पात्रता आणि शिक्षणशास्त्रातील आवश्यक प्रशिक्षण, पदवी असे असतानाही स्वत:च्या शाळेवर आणि एक प्रकारे स्वत:वर अविश्वास दाखवून महापालिका, जिल्हा परिषदा तसेच महाराष्ट्रातील असंख्य खाजगी अनुदानित शाळांमधील उत्तमोत्तम शिक्षकांनी पूर्वी एक मोठी चूक केली होती.
या शिक्षकांनी आपली स्वत:ची मुले मात्र अपुरे शिक्षण असलेल्या आणि प्रशिक्षण मुळीच मिळत नसलेल्या शिक्षकांच्या जीवावर चालणाऱ्या पण ' इंग्रजी माध्यम ' अशी चकचकीतपाटी लावलेल्या शाळांमध्ये ( ज्यातील बहुसंख्य NON TEACHING EDUCATIONAL INSTITUTE आहेत. ) घातली होती. अशा अनेक शिक्षकांना अपेक्षाभंगाचे दु:ख वाट्याला आले. हे शिक्षक ज्या शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिकवतात त्या शाळेतील मुले मोठमोठ्या परीक्षांमध्ये यशस्वी होऊन पेढे द्यायला येत असताना आपली स्वत:ची मुले मात्र अतिशय तोकडे, अपुरे यश मिळवताना पाहून अशा अनेक शिक्षकांच्या मनाला खूप यातना झाल्या. पण याने केले, त्याने केले म्हणून प्रवाहपतित मनोवृत्तीने अशा अनेक शिक्षकांनी आपल्याही मुलांना कमी शिकलेल्या, चुकीचे पण भराभर इंग्रजी बोलणाऱ्या शिक्षकांच्या हाती सोपवले होते.
या शिक्षकांनीच स्वत:च्या शाळेवर आणि स्वत:वर अविश्वास दाखवल्याने इतर समाज देखील ' इंग्रजी माध्यम ' अशी चकचकीत पाटी लावलेल्या शाळांच्या ( ज्यातील बहुसंख्य NON TEACHING EDUCATIONAL INSTITUTE आहेत. ) नादी लागला आणि गेल्या २५ वर्षात महाराष्ट्राची किमान आणि कमाल अशा शैक्षणिक गुणवत्तेत कमालीची घसरण झाली. या घसरणीला मराठी माध्यम शाळांचा घसरता दर्जा कारणीभूत आहे अशी अफवा काही स्वयंसेवी संस्थांनी पसरवली आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे एकूण समाजानेच मराठी माध्यमाकडे पाठ फिरवली.
२५ वर्षांपूर्वी मराठी माध्यमाच्या शिक्षकांनी केलेल्या या भयानक चुकीमुळे त्यांच्या मुलांची अपेक्षित प्रगती तर झाली नाहीच शिवाय त्यांच्या स्वत:च्या शाळा बंद पडण्याची वेळ आली. या शाळा वाचवण्याचा विचार मनात ठेवून अत्यंत नाईलाजाने वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील काही शिक्षकांनी आपली मुले विविध NON TEACHING EDUCATIONAL INSTITUTE म्हणजे convent शाळांमधून काढून आपापल्या मराठी माध्यमाच्या शाळेत घातली आहेत.
या शिक्षकांनी हे काम केवळ स्वत:ची नोकरी वाचविण्यासाठी केले असले तरी त्यांनी नकळत आपल्या मुलाचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याची कृती केली आहे. यापुढे त्यांच्या मुलांचा इंग्रजी भाषा हा विषय सुधारेल, गणित आणि विज्ञानातील कल्पना मराठीतून नीट समजतील. अनेक वर्षे मराठीतून उत्तम शिकवल्याने आपल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या यशानंतर पेढे खाणाऱ्या पण त्याचवेळी आपल्या स्वत:च्या मुलांच्या जेमतेम काठावरील यशाने हिरमुसलेल्या या शिक्षकांना पुढील काळात आपल्या स्वत:च्या मुलांच्या मोठ्या यशानिमित्त पेढे वाटण्याची संधी मिळेल. इंग्रजीच्या स्पर्शाने झालेले मुलांचे नुकसान आता मराठी माध्यमातील उत्तम वातावरणाने भरून निघेल.
या शिक्षकांचे अनुकरण सर्वच शिक्षकांनी करावे तसेच सर्व पालकांनी करावे असे आवाहन !
या ! सर्वोत्तम अशा मराठी माध्यमात प्रवेश घ्या ! आज इंग्रजी माध्यमात शिकत असलेल्यांचे माध्यम बदल आणि प्रगत, समृद्ध, संपन्न मराठी माध्यमातून उरलेले शालेय शिक्षण घ्या, हे कळकळीचे आवाहन ! - अनिल गोरे, मराठीकाका

इतरांचा अनुभव हाही स्वानुभवासारखाच दुसरा गुरु !


पुण्यातील माझा एक मराठी भाषिक मित्र लोकांना वीजमित्र (inverter), विद्युत घट इ. वस्तू विकून त्यांची पुढे देखभालही करतो. त्याचे सर्वच्या सर्व ग्राहक मराठी भाषिक असूनही त्याला मात्र इंग्रजीचा जबरदस्त किडा चावलेला होता. त्याचे पुण्यातील जवळचे दोन स्पर्धक असून एक गुजराती आणि एक मारवाडी असून ते स्पर्धक काही वर्षांपूर्वी स्वत: महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांना मराठीचा गंध नव्हता. तिघांचा व्यवसाय साधारण एकाच वेळी सुरु झाला पण दहा वर्षांनी ते दोघेही व्यवसायात माझ्या मित्रापेक्षा पुढे होते. गुजराती, मारवाडी मुळातच धंद्याला हुशार म्हणून ते आपल्यापुढे असणारच या अंधश्रद्धेमुळे ते पुढे असावेत असे माझ्या मित्राचे प्रामाणिक मत होते.
मी एकदा सहज त्याची आणि त्याच्या स्पर्धकांची माहितीपत्रके, जाहिराती यांचे निरीक्षण केले. त्याचे अमराठी स्पर्धक सर्व कागदपत्रे, पावत्या, माहितीपत्रके, वेष्टणे, ओळखचिठ्ठी, शीर्षपत्रे यावर कटाक्षाने मराठीचा वापर करतात. माझ्या मित्राला मात्र लहानपणापासून त्याच्या मराठी माध्यम शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, त्याच्या घरातील कारकुनी पेशातील लोक, त्याचे रिकामटेकडे मित्र आणि व्यवसाय म्हणजे काय याची किंचितही कल्पना नसलेले सल्लागार या सर्वांनी "इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने धंदा करायचा तर इंग्रजीपुढे व्यवस्थित लोटांगण घातले पाहिजे ", असे बजावले होते.
व्यवहारशून्य पण पुस्तकी शिक्षण घेऊन इंग्रजीची भलावण करणाऱ्या लोकांच्या नादी लागून या मित्राने आपला व्यवसाय १०० % इंग्रजीत चालवला होता. इंग्रजीच्या अतिरेकामुळे तो व्यवसायात मागे पडला. तीन वर्षांपूर्वी मी त्याच्याकडून वीजमित्र घेताना त्याला त्य वस्तूवर वीजमित्र अशी ठळक अक्षरे उमटवून द्यायला लावली, त्यासाठी तो अगोदर टाळाटाळ करीत होता पण मराठी अक्षरे त्या वस्तूवर नसली तर मी खरेदीच करणार नाही हे कळल्यावर त्याने नाईलाजाने माझी मागणी पूर्ण केली. मी त्या व्यवहाराची पावतीही स्वतंत्रपणे मराठी या जगातील पहिल्या आणि प्रगत, आधुनिक भाषेत मराठी शब्दांसह मराठीत टंकित करून द्यायला लावली. ही घटना खरी आहे का ? अशी शंका असलेल्या सर्व शंकासुरांना माझा वीजमित्र आणि मराठी पावती वैगेरे पाहण्यास आमंत्रण देत आहे ! त्याने अधिकाधिक मराठीचा वापर सुरु केल्यावर मी त्याला माझ्या परिचयातील अनेक ग्राहक देखील मिळवून दिले. माझ्या मित्रासाठी आज मराठी ही पोट भरभरून भरणारी भाषा ठरते आहे.
आता तो त्याच्या स्पर्धकांच्या तुलनेत मागे नाही. ग्राहकाच्या भाषेतून व्यवहार करणे हे धंद्यातील एक चातुर्य आहे.
काही दिवसांनी त्याने मला एक एक दोनोळी ( दोन ओळींची कविता ) ऐकवली.
मराठीची करून नांदी
मंदीत धंद्याची चांदी !
- अनिल गोरे, मराठीकाका.

बदलाचे स्वागत !


पुणे शहरातील अनेक मराठी माध्यम शाळांमधील प्रवेश संख्या वाढू लागली आहे. शहाण्या आणि सुज्ञ पालकांनी मुलांना मराठी माध्यमात घालण्याचा निर्णय घ्यायला सुरुवात केली त्याचे मी स्वागत करतो.
या बदलात सधन आणि उच्चशिक्षित पालकांचा सहभाग वाढत आहे हे चांगले लक्षण आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वीपर्यंत शाळेच्या माध्यमाची निवड खिशाकडे पाहून करायची पद्धत आढळत होती. भरपूर पैसे असतील तर इंग्रजी माध्यम निवडावे आणि पैसे पुरेसे नसतील अशा गरीबांनीच मराठी माध्यम निवडावे असा प्रघात होता. ही पद्धत अशास्त्रीय आणि दिशाभूल करणारी आहे अशी खात्री अनेक पालकांना अनुभवाने पटली.
कितीही पैसे ओतले तरी आपल्या मुलांचे इंग्रजी कच्चे राहते, इंग्रजी माध्यम शाळांमध्ये इंग्रजी व्याकरणाचे कौशल्य अविकसित राहते याची जाणीव झालेले पालक आता
" इंग्रजी सुधारण्यासाठी " का होईना, मराठी माध्यमाची निवड करत आहेत.
इंग्रजी सुधारण्यासाठी सर्वोत्तम ठरणारे ' मराठी मध्यम ' निवडल्यामुळे या पालकांच्या मुलांचे इतर विषय देखील मराठीच्या अनेक अंगभूत गुणांमुळे अधिक पक्के होतील हा त्यांना मिळणारा अतिरिक्त लाभ असेल.
मराठी माध्यमाकडे वळलेले हे पालक या चांगल्या निर्णयासोबत एक मोठी चूक करीत आहेत, ती त्यांनी टाळावी, असे मी आवाहन करतो. मराठी माध्यम स्वीकारताना गणित आणि विज्ञान विषयाचे आकलन तसेच अभिव्यक्तीत अडथळा आणणारा ' सेमी इंग्रजी ' हा घातक पर्याय निवडून हे पालक मुलांच्या विकासाची पूर्ण संधी मुलांना नाकारत आहेत, असे मला वाटते.
असो, नव्याने मराठी माध्यमाकडे वळणारा श्रीमंत किंवा धनाढ्य वर्ग अजूनही दोन विषयांसाठी इंग्रजीवर जीव लावून आहे पण येत्या काही वर्षात सेमी इंग्रजी या घातक पर्यायाने होणारे नुकसान लक्षात घेऊन हा वर्गदेखील सेमी इंग्रजी नसलेल्या पूर्ण मराठी माध्यम वर्गांची आणि शाळांची निवड करेल अशी माझी खात्री आहे.
- अनिल गोरे, मराठीकाका

अधिकोश ( बँक ) कर्मचाऱ्यांचा छळ ! ( कर्मचाऱ्यांच्या नजरेतून !! )


माझ्या एका मित्राची चार अधिकोशांत नऊ खाती आहेत. एक राष्ट्रीयीकृत, एक सहकारी, एक खाजगी भारतीय आणि एक खाजगी परदेशी अधिकोष आहे. त्याला पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवायची होती. मी त्याला सल्ला दिला की प्रथम प्रत्येक अधिकोशात मुदत ठेवीच्या मराठी अर्जाची मागणी कर . असे अर्ज यातील एकही अधिकोशात उपलब्ध नव्हते म्हणून त्याने लेखी मागणी केली. अतिशय चिडचिड करून अखेर तीन अधिकोशांनी मराठी अर्ज उपलब्ध केले. परदेशी खाजगी अधिकोशाने असा अर्ज उपलब्ध केला नाही म्हणूनतेथील खातेच त्याने बंद करून टाकले.
राष्ट्रीयीकृत अधिकोशात त्याने १००० रुपयांच्या ३०० ठेवी ठेवल्या. आणि इतर दोन अधिकोशांत प्रत्येकी १००० रुपयांच्या प्रत्येकी १०० ठेवी ठेवल्या. या सर्व ठेवींच्या पावत्या देताना मात्र संबंधित कर्मचाऱ्यांची ' लय भारी ' चिडचिड झाली.
चिडचिडीचे कारण अगदी साधे होते. माझ्या मित्राने मुदत ठेवीची पावती मराठी भाषेतून आणि मराठी अंकासह देण्याची लेखी मागणी आणि मुदत ठेव पावती मराठीतून देण्याचे बंधन त्या असल्याचे भारतीय मध्यवर्ती अधिकोश ( रिजर्व बँक ) परिपत्रक [DBOD. No. Leg.BC.75/09.07.005/2008-09 dated 3/11/2008 ] संबंधित बँक अधिकार्यांना दाखवले. सध्या मुदत ठेव पावत्या संगणकावरून थेट छापल्या जातात पण बहुतेक अधिकोशातील संगणक मात्र अडाणी, अशिक्षित असून त्या संगणकांना मराठीतून पावत्या छापण्याची आज्ञा व प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.
झाले, संगणक अडाणी, अशिक्षित असल्याने मराठी लिहिता वाचता येणारे कर्मचारी शोधून त्यांना या पावत्या मराठीतून हाताने लिहून देण्याचा आदेश देण्यात आला. इतक्या पावत्या पूर्णपणे मराठीतून सुवाच्य अक्षरांत लिहिताना कर्मचाऱ्यांची चिडचिड झाली आणि त्यांना तो छळ वाटला.
गेली साठ वर्षे मराठीचा छळ करणाऱ्या अधिकोशांचे आणि कर्मचाऱ्यांचे मराठीने उट्टे काढले.
मला ही युक्ती सुचली आणि फारच परिणामकारक ठरली आहे. माझ्या मुदत ठेवी यापुढे प्रत्येकी १०० रुपयांच्या असतील आणि मोठ्या रकमेच्या मुदत ठेवी ठेवणे शक्य असताना देखील मी मुद्दाम त्यांची वाटणी १०० रु. च्या ठेवीत करण्याची मी काळजी घेणार आहे.
मराठी मनाचा निर्धार !
जिथे मराठीत कारभार !!
तिथेच करू व्यवहार !!!
- अनिल गोरे, मराठीकाका

निकालाने निराश होणारे पालक आणि त्यांच्या मुलांसाठी !


या आठवड्यात अनेक शाळांचे निकाल लागत आहेत. इंग्रजी माध्यमातील शाळांच्या आणि मराठी माध्यमातील सेमी इंग्रजी वर्गांतील निकालात, .......कमी गुण मिळालेल्या आणि गुणानुक्रम फारच खाली आलेल्या मुलांच्या पालकांना त्या शाळांमधील शिक्षक अशा निकालाचे एक महत्वाचे आणि रहस्यमय कारण सांगतात.
" तुमच्या मुलाचे / मुलीचे इंग्रजी फार म्हणजे फारच कच्चे आहे "
हे ते प्रमुख कारण असते.
सर्व विषय इंग्रजीत शिकवून, इंग्रजीतील पुस्तके, गाणी, ध्वनिमुद्रिका, चित्रफिती यांचा भरपूर मारा करून आणि त्याहून महत्वाचे म्हणजे मराठीसारखी एक प्रगत भाषा बोलण्यास सक्तीची बंदी लादून देखील इंग्रजी कच्चे राहिल्याचे कारण हे शिक्षक अत्यंत मनमोकळेपणाने सांगतात.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला किंवा सेमी इंग्रजी हा घातक पर्याय निवडला की इंग्रजी स्वाभाविकपणे कच्चे राहते. इंग्रजी कच्चे राहणे हा इंग्रजी माध्यम निवडण्याचा अपरिहार्य परिणाम आहे, हे मात्र अनेक भोळ्याभाबड्या पालकांना माहित नसते. इंग्रजी माध्यम निवडले आणि मराठी किंवा आपली मातृभाषा बोलायला बंदी घातली की त्याचा पहिला आणि प्रभावी परिणाम म्हणजे इंग्रजी कच्चे राहणे हाच होतो.
मागील आठवड्यात असा मन अप्रसन्न करणारा निकाल आणि त्यचे वरील कारण ऐकण्याचा अनुभव इंग्रजी माध्यमातील आणि सेमी इंग्रजी वर्गांमधील विद्यार्थी / विद्यार्थिनींच्या असंख्य पालकांना आला आहे. या आठवड्यात इंग्रजी माध्यमातील आणि सेमी इंग्रजी वर्गांमधीलविद्यार्थी / विद्यार्थिनींच्या असंख्य पालकांना असाच अनुभव येणार आहे.
असा अनुभव आला तर मन दु:खी होणार पण अशा विद्यार्थी / विद्यार्थिनींच्या असंख्य पालकांनो, घाबरू नका ! या परिस्थितीवर काहीच उपाय सुचत नसल्याने पूर्वी दरवर्षी पालक काही काळ दु:खी होऊन परिश्तिती विसरून जायचे आणि पुन्हा पुढील वर्षीच्या निकालाच्या वेळेपर्यंत निवांत, निश्चित राहायचे. या परिस्थितीतून बाहेर पडून इंग्रजी सुधारण्याचे काही उत्तम उपाय मी सुचवत आहे ते करून पहा. खात्रीने गुण येईल.
उपाय १ ] समस्या समजावून घ्या -
इंग्रजी माध्यमात आणि सेमी इंग्रजी वर्गांत शिकल्यामुळेच आपल्या मुलांचे इंग्रजी कच्चे राहते हे प्रथम मनाशी मान्य करा.
उपाय २ ]] माध्यम बदला -
स्थिति बदलेल. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे कच्चे राहिलेले इंग्रजी सुधारण्यासाठी सध्याच्या संस्थेची मराठी माध्यम शाळा असेल तर तिथे मुलांना प्रवेश घेऊन द्या किंवा दुसऱ्या संस्थेच्या मराठी माध्यम शाळेत प्रवेश घेऊन द्या !
उपाय ३ ] मातृभाषेला प्राधान्य द्या -
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे कच्चे राहिलेले इंग्रजी सुधारण्यासाठी माध्यम बदलणे सामाजिक प्रतिष्ठा, घरातील व्यक्तींचा हट्टी स्वभाव अशा काही टाळता न येणाऱ्या कारणामुळेमुळे शक्य नसेल तर निदान घरी भरपूर प्रमाणात मातृभाषेतून आणि इंग्रजी शब्दांची विचित्र भेसळ न करता बोलण्याचा सराव वाढवा.
उपाय ४ ] मराठी माध्यमातील इंग्रजी भाषा शिक्षकाचे सहाय्य घ्या -
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे कच्चे राहिलेले इंग्रजी सुधारण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळेतील, इंग्रजी व्याकरणाची उत्तम जान असलेल्या अनुभवी इंग्रजी भाषाशिक्षकाचे मार्गदर्शन आपल्या मुलांना मिळवून द्या ! मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी अगदी पक्के करून घेणारे हे शिक्षक अनेक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे त्यांचे कच्चे राहिलेले इंग्रजी सुधारण्यासाठी अतिशय चांगले आणि समर्थ मार्गदर्शन करू शकतील, याची खात्री बाळगा.
उपाय ५ } मराठी माध्यमातील मुलांशी मैत्री वाढवण्यास प्रोत्साहन द्या -
आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे त्यांचे कच्चे राहिलेले इंग्रजी सुधारण्यासाठी आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांसोबत खेळायला, सहलीला आणि अभ्यासाला पाठवा. मराठी माध्यमातील मुले इंग्रजी वेगाने बोलू शकत नसली तरी वेगाने लिहू शकतात आणि त्यांचे इंग्रजी व्याकरण चांगले असते. जसे आंब्याच्या आढीत सफरचंद ठेवले तरी त्याला आंब्याचा वास लागतो तसेच होईल आणि अनेक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे कच्चे राहिलेले इंग्रजी सुधारण्यासाठी या सहवासाचा उपयोग होईल.
हे उपाय करून पहा आपल्या मुलांचे इंग्रजी सुधारावे ही अनेकांच्या मनातील आत्यंतिक तळमळ यशस्वी होईल. वार्षिक परीक्षेचे निकाल लागल्यावर पुढे दोन अडीच महिने सुट्टी असते. या मोठ्या सुट्टीचा सदुपयोग इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे कच्चे राहिलेले इंग्रजी सुधारण्यासाठी अवश्य करून घ्यावा असे मी कळकळीने सुचवत आहे --
अनिल गोरे, मराठीकाका.

इंग्रजीचे भाषा दारिद्र्य

इंग्रजी संबंधित भाषा दारिद्र्याची आणखी एक अनुभूती ! हसण्यातील विविधतेचा अभाव !!
कोणताही आशय आशय आणि कोणताही विषय नीट आणि सखोल न समजणे, लांबलचक शब्द, त्याहून लांबलचक वाक्ये, जखडलेल्या शब्द्क्रमामुळे वाक्यरचनेतील अवघडलेपण या कारणांमुळे इंग्रजी भाषेच्या वापरासाठी रास्त वेळेपेक्षा अधिक वेळ लागतो, बहुतेक सर्व तथाकथित इंग्रजी शब्दांची निर्मिती न करता अन्य भाषेतून उचलेगिरी केल्याने उच्चार साधर्म्याचा अभाव ही इंग्रजीची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
एक मानवी संवादासाठीची भाषा म्हणून विचार करता वरील सर्व त्रुटी इंग्रजीच्या मागासलेपणाची प्रमुख कारणे आहेत, असे मला वाटते. या त्रुटींचे काही जबरदस्त परिणाम निरीक्षणातून जाणवतात.
निरीक्षण १ ] हे निरीक्षण भारत आणि तत्सम बिगर इंग्रजी भाषक देशातील आहे आणि ते अशा सर्व बिगर इंग्रजी देशात आढळते. भारतातील अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील वार्षिक स्नेह संमेलनात एक परिस्थिती पाहायला मिळते. अशा शाळांमधील कार्यक्रमातील बहुतेक सर्व करमणूक कार्यक्रम त्या शाळा ज्या भागात आहेत त्या भागातील स्थानिक भाषेत असतात. स्थानिक भाषेतील कार्यक्रम सर्व विद्यार्थी आणि पालक अगदी रंगून पाहतात, हाताने, पायाने ठेका धरणे, टाळ्यांचा कडकडाट, चीत्कार, उसासे, हास्याच्या लकेरी, पुन्हा सादरीकरण मागणी अशा विविध प्रकारे स्थानिक भाषेतील कार्यक्रमाला प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. इंग्रजी ही मागासलेली भाषा अशा शाळेचे अधिकृत माध्यम असल्याने बळेबळेच एखाद् दुसरा कार्यक्रम इंग्रजीतून असतो. इंग्रजी कार्यक्रमाच्या वेळी अतिशय शांतता ( अशी शांतता बहुदा इतरत्र दु:खद प्रसंगीच अनुभवायला मिळते. बळेच सादर केलेल्या इंग्रजी कार्यक्रमातील विनोद किंवा इतर कोणत्याही भावना विद्यार्थी आणि पालकांच्या मनाला भिडत नाहीत. कार्यक्रम बसवणाऱ्या शिक्षकाला जर त्यातील विनोदाच्या जागा माहीत असल्या तर त्यावेळी ते स्वत:हून हसतात आणि ज्या पालक आणि विद्यार्थ्यांचे अशा शिक्षकांकडे लक्ष असते ते नाईलाजाने शिक्षकाचा मान राखण्यासाठी देखल्या देवा दंडवत या न्यायाने थोडेसे स्मित करतात. भारतीय भाषेतील कार्यक्रमाला मिळणारा ' उत्स्फूर्त' प्रतिसाद इंग्रजीतून सादर केलेल्या कार्यक्रमाला कधीच मिळत नाही. इंग्रजी माध्यम निवडण्याची चूक केल्यामुळे काही विद्यार्थी आणि पालक, मंचावर काय चालले आहे त्यातील काहीही न कळून देखील, जुलुमाचा रामराम म्हणून इंग्रजी कार्यक्रमाच्या वेळी थोडासा जुजबी प्रतिसाद आपल्या मुलांना प्रोत्साहन म्हणून देतात.
निरीक्षण २ ] सध्या अनेक मराठी आणि हिंदी विनोदांचे कार्यक्रम विविध वाहिन्या दाखवतात. यातील अनेक विनोदी प्रहसने किंवा एकपात्री सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. छायाचित्रण सुरु असलेल्या ठिकाणच्या प्रेक्षकांत उत्स्फूर्त हशा उसळताना दिसतो त्याचप्रमाणे घरोघरी हे कार्यक्रम पाहणाऱ्या कुटुंबात देखील उत्स्फूर्त हशा उसळतो आणि त्यावरून कार्यक्रमाच्या जागी उसळणारा हशा खरोखर उत्स्फूर्त आहे हे घराघरात कळते. अशाच प्रकारचे इंग्रजीतील कार्यक्रम ज्या वाहिनीवर सादर होतात तिथे उत्स्फूर्त हशा उसळताना दिसत नाही तर बहुतेक कार्यक्रमात ध्वनिमुद्रित हशा पार्श्वसंगीत म्हणून वाजवतात आणि घरोघर कार्यक्रम पाहणारे प्रेक्षक हास्याचे ध्वनिमुद्रण ऐकल्यावर मग जागे होऊन स्वत:शीच स्मित करतात. इंग्रजी ज्या भागाची मूळ भाषा मानली जाते त्या इंग्लंडमध्ये देखील सात मजली हास्य, गडगडाटी हशा, पोट धरून हसणे, हसून हसून पुरेवाट, हास्याचे धबधबे, हास्याचे कारंजे असले प्रगत आणि सशक्त हास्यप्रकार आढळत नाहीत.वर उल्लेख केलेल्या इंग्रजी भाषेतील त्रुटींमुळे इंग्रजी विनोद कळायला जो अधिक वेळ लागतो त्यामुळे हसण्यातील उत्स्फूर्तता नष्ट होते. विनोद कळेपर्यंत हसण्याची वेळ निघून गेल्याचे श्रोत्यांच्या, प्रेक्षकांच्या लक्षात येतेआणि ते हसणे बहुधा टाळतात. एका जाहिरातीतील बंटीचा साबण जसा हळू कार्य करतो तसे इंग्रजी आकलन देखील कमी वेगाने होते.
इंग्रजीच्या अंगभूत मागासलेपणामुळे आकलन आणि अभिव्यक्ति या दोन प्रमुख मानवी भाषिक कार्यांतजे प्रचंड अडथळे येतात त्यामुळे मुळातच अबोल बनलेल्या इंग्रजांची मजल विनोद उशिरा कळल्याने स्मित ( smile ) , खुदुखुदू हसणे ( grin ) या पलीकडे जात नाही.
आरोग्यपूर्ण जगण्यासाठी हसणे अतिशय आवश्यक असल्याने आपल्या आयुष्यात शक्य असेल तिथे इंग्रजी टाळा आणि भारतीय भाषा, शक्यतो मराठीचा वापर वाढवा, असे जगभरातील सर्वांना आवाहन ! - अनिल गोरे, मराठीकाका

मराठी माध्यम शाळांचे मारेकरी ! मराठी माध्यम शाळांच्या जीवावरच जगतात !!


मराठी माध्यम शाळा नावाचा एक विनोदी प्रकार सध्या महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत दिसतो. या शाळांतील उत्तम गुणवत्ता असलेले अनेक शिक्षित ( सुशिक्षित हा शब्द मुद्दाम टाळला आहे ) असे पुरुष आणि महिला शिक्षक इंग्रजीबाबत न्युनगंडाने पछाडलेले आढळतात.
अशा शिक्षकांच्या नसानसातून, त्यांच्या शब्दा - शब्दांतून आणि वाक्या - वाक्यांतून हा न्यूनगंड सतत व्यक्त होत असतो. या न्यूनगंडाच्या आहारी जाऊन अशा शिक्षकांनी मराठी माध्यम शाळांची क्षमता उत्तम असूनही या शाळांना अवकळा आणली आहे. न्यूनगंडाने भारलेल्या, पछाडलेल्या अशा शिक्षकांचे वर्तन, संभाषण लहान वयातील कोवळी मुले ऐकतात आणि मुलांची अशी समजूत होते की मराठी ही मराठी माध्यमाच्या शाळेत देखील वापरण्याच्या लायकीची भाषा नाही. इंग्रजी ही मराठीपेक्षा श्रेष्ठ भाषा आहे म्हणूनच आपले मराठी माध्यमाचे शिक्षक दर दोन शब्दागणिक एक इंग्रजी शब्द आपल्या तोंडावर मारतात. हे अनुभवणारा विद्यार्थी दहा पंधरा वर्षांनी स्वत: पालक झाल्यावर, सर्व इंग्रजी शब्द तोंडावर मारणारी शाळा शोधू लागतो. स्वत:ला उत्तम शिक्षण मिळालेली मराठी शाळा असे पालक टाळतात. आपल्याला मिळाले तसे उत्तम शिक्षण मिळाले नाही तरी चालेल पण न्यूनगंडातून अर्धवट इंग्रजी झाडणाऱ्या शिक्षकांच्या तुलनेने आत्मविश्वासाने चुकीचे पण पूर्ण इंग्रजी झाडणारे शिक्षक असणारी शाळा त्या पालकांना जवळची वाटू लागते.
मराठी माध्यमातील शिक्षक आपला न्यूनगंड वारंवार कसा प्रकट करतात त्याची काही उदाहरणे मी पुढे देत आहे.
हे शिक्षक एखाद्या मुलाला सांगतात " जा रे , चॉक घेऊन ये. " मुलाची खात्री पटते की खडू हा मराठी शब्द मराठी माध्यमाच्या शाळेतही वापरण्याच्या लायकीचा नाही आणि मराठी ही भाषा मराठी माध्यमाच्या शाळेतही वापरण्याचा लायकीची नाही.
१९८० नंतरअसे शिक्षक कोणाला भेटले की सांगत " मी मराठी मिडीयम स्कूलमध्ये टीचर आहे. "
शिक्षक हा मराठी शब्द उच्चारर्ण्याची यांना लाज वाटते. त्याचबरोबर सुपरवायझर, क्लार्क, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, ऑफिस, लायब्ररी, लाबोरेटरी, सेकंड फ्लोअर, अटेंडन्स, बेंच, बोर्ड, नोटीस बोर्ड, ग्राउंड, स्पोर्टस, पेपर, चेकिंग, इन्स्पेक्शन, बेल, पिरियड, या जगातील ४००० भाषांमधून इंग्रजांनी उचललेल्या सर्व शब्दांना अतिशय सुयोग्य, अर्थपूर्ण, अर्थवाही मराठी प्रतिशब्द आहेत याचे भानच न्यूनगंडाने पछाडलेल्या या शिक्षकांना राहिले नव्हते.अर्धी इंग्रजी - पाउण मराठी अशी विचित्र, विसंगत, अशिक्षितांना शोभेशी इंग्रजीशरण बडबड मराठी माध्यमातील हजारो न्यूनगंडी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थी - विद्यार्थिनींच्या समोर १९८० नंतर अविरतपणे केली.
१९८० पासून मराठी शब्द वापरणे बंद करून इंग्रजी शब्दांची मुजोरी आणि स्वत:ची इंग्रजीबाबत लाचारी दैनंदिन स्वरुपात प्रदर्शित केल्याने असल्या शिक्षकांपेक्षा स्वत:च्या भाषेबाबत आणि स्वत:च्या शाळेच्या माध्यमाबाबत किंचितही न्यूनगंड मानत नसलेले शिक्षक जिथे आढळले अशा इंग्रजी माध्यम शाळांकडे मराठी माध्यम शाळेतील माजी विद्यार्थी आणि पुढे पालक बनलेल्या विद्यार्थी - विद्यार्थिनींचा ओढ निर्माण झाला यात नवल ते कसले ?
आता मराठी माध्यम शाळांमधील शिक्षकांना सुरक्षितता आणि आणि मोठा पगार या गोष्टी हातून निसटण्याची भिती वाटू लागली असल्याने ते मराठी शाळा वाचवा म्हणून आंदोलने करतात पण यांना मराठी भाषेबाबत आत्म्विश्वास वाटत नसल्याने यांच्या शाळा यांच्यापासूनच वाचविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यांनी मराठी भाषेतील शब्द मराठी वाक्यात वापरण्याचे यापुढेही टाळले तर अशा शाळा बंद पडू देणेच योग्य होईल -- अनिल गोरे, मराठीकाका.

उपयुक्त मराठी

मराठी ही जगातील पहिली नागरी भाषा असावी असा माझा एक दावा असून भाषिक कौशल्याचा पाया भक्कम करण्यासाठी मुलभूत भाषा म्हणून जगातील कोणालाही मराठीचा उत्तम अभ्यास उपयुक्त ठरेल. या अर्थाने मराठी ही जगातील सर्वोत्तम भाषा असल्याने इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेचे कौशल्य हवे असेल अशा मुलांना लहानपणी मराठी माध्यमातून शिकवावे हा माझा सल्ला जगभरासाठी अतिशय योग्य आहे असे दाखवणारा पुढील ब्रिटीश काउन्सिलने प्रसिद्ध केलेल्या अहवालातील मुद्दे पहा.
अहवालातील माहिती - इतर भाषेच्या मुलांच्या तुलनेत मराठमोळ्या मुलांचे इंग्रजी उत्तम आहे. दुसरा क्रमांक मल्ल्याळी मुलांचा लागतो. इंग्रजीवर प्राविण्य सिद्ध करण्यासाठी टॉफेलसारख्या परीक्षा आयोजित करणारी इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम (IELTS) च्या माध्यमातून ब्रिटीश काउन्सिलने हा निष्कर्ष मांडला आहे. इंग्रजी बोलणाऱ्या सर्व देशात IELTS ने ही परीक्षा घेतली.
- २०१३ मध्ये जागतिक पातळीवर घेतलेल्या चाचणीतील ह्र निष्कर्ष मराठी भाषकांसाठी प्रेरणादायक आहेत. मराठी भाषा आणि मराठी भाषक जगाचे भाषिक नेतृत्व करू शकतील. ( इति - अनिल गोरे, मराठीकाका )

अहवालातील माहिती - मातृभाषा मराठी असलेले विद्यार्थी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणाऱ्यांध्ये पहिल्या स्थानावर, त्यानंतर मल्ल्याळी, तमिळ, हिंदी, पंजाबी मुलांचा क्रमांक लागतो. IELTS ने इंग्रजी लेखन, वाचन, बोलणं आणि ऐकणं अशा चार पातळ्यांवर परीक्षा घेतली. इतर देशातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांनी इंग्रजीवर चांगलेच प्राविण्य मिळवले आहे, अशी माहिती ब्रिटीश काउन्सिलचे भारतातील परीक्षांचे संचालक सराह देवेराल यांनी सांगितलं.
- इंग्लंड, अमेरिकेसह सर्व देशातील ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगले समजावे, इंग्रजीतून चांगले लिहिता, वाचता, बोलता यावे असे त्यांना आणि त्यांच्या पालकांना वाटत असेल तर पहिली भाषा म्हणून मराठी शिकावी आणि मराठीच्या माध्यमातून इंग्रजी तसेच अन्य भाषा शिकाव्यात.मराठी ही आई आहे आणि इंग्रजी ही मावशी आहे असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर आपण लक्षात घेतले पाहिजे की, आई असेल तरच मावशी असते. आईशिवाय मावशी अस्तित्वातच येऊ शकत नाही. (इति -अनिल गोरे, मराठीकाका )
असो, महाराष्ट्रातील नवतरुण पालकांनो उगाच इंग्रजी माध्यम शाळा या विषाची परीक्षा घेत बसू नका. आपल्या मुलांसाठी मराठी माध्यमाची शाळा निवडा, सेमी इंग्रजीचा खुळचट पर्याय टाळा आणि इंग्रजीसह सर्व विषयांत उत्तम प्राविण्य मिळवण्याची सुसंधी आपल्या लाडक्या मुलामुलींना मिळवून द्या ! मुलांचे हित हे इंग्रजी माध्यमात घालण्य्साठी दिल्या जाणाऱ्या शेजारपाजारच्यांच्या अर्धवट, अशास्त्रीय सल्ल्यापेक्षा मोलाचे असते, याचे भान सोडू नका.
यापूर्वी आपली मुले इंग्रजी माध्यमात किंवा सेमी इंग्रजीत घातलेल्या पालकांनी तर आपली चूक सुधारण्यासाठी विशेष कृती करण्याची आवश्यकता आहे. माध्यम तातडीने बदलून मराठी माध्यम निवडा. यशाचे आकाश तुमच्या मुलाची वाट पाहत आहे. चला आज काही वादळी ( तुफानी ) करू या ! - अनिल गोरे, मराठीकाका

काही जिद्दी पुणेकरांचे अभिनंदन !


महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर मिळून भारतात एकूण ३० कोटीहून अधिक मराठी भाषक आहेत. या सर्वांनी मराठी माध्यमातून शिकण्याचा निर्धार केला पाहिजे. कमी अक्षराचे जोडाक्षर नसलेले सुटसुटीत शब्द, कमी शब्दांची लहान वाक्ये, वाक्यातील शब्द बरेचसे मागेपुढे केले म्हणजे शब्द्क्रमाबाबत फार जागरुकता बाळगली नाही तरी वाक्याचा अर्थ आणि अर्थछटा कायम राहील अशा लवचीक वाक्याराचानेला पूरक व्याकरणाचे नियम, दुसऱ्या भाषेतील शब्दांसाठी पूर्वपरिचित मराठी शब्दांच्या जोडणीतून कार्यकारणभावाच्या आधारे नवे मराठी प्रतिशब्द निर्माण करण्याची उज्ज्वल परंपरा. ही मराठीची जगावेगळी वैशिष्ट्ये आहेत. मानवी जीवनातील शिक्षण, प्रशिक्षण, प्रशासन, संवाद, संज्ञापन, प्रचार, प्रसार, अहवाल, करार, कलायुक्त सादरीकरण, व्यापारी नोंदी, पावत्या, माहितीपत्रके, व्यवहार चिठ्ठ्या या आणि अशा असंख्य उद्देशासाठी मराठी ही जगातील सर्वोत्तम भाषा ठरू शकेल. मराठीच्या या गुणांमुळे मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर करणारे पुणे शहर महाराष्ट्रात आणि देशात शिक्षणाबाबत एकेकाळी आघाडीवर होते.
महाराष्ट्रातील इतर जिल्हे शिक्षणात मागे आणि पुणे सर्वात पुढे ही विषमता दूर करून पुण्याची स्थिती बदलण्याचे काही पुणेकरांनी केलेले प्रयत्न आता यशस्वी झालेले आढळतात. चिकाटीने प्रयत्न करणाऱ्या अशा काही जिद्दी पुणेकरांचे अभिनंदन !
इंग्लंड आणि पुणे या जगातील केवळ दोन भागात अनेकांनी वरील सर्व व्यवहारासाठी अधिकाधिक प्रमाणात इंग्रजीचा वापर सुरु केला असा इतिहास आहे. सर्व मानवी व्यवहारासाठी इंग्रजीपेक्षा उपयुक्त आणि वापरसुलभ अशा जर्मन आणि फ्रेंच, लाटिन या भाषा पूर्वीपासून वापरत होत्या. कालांतराने सध्याच्या इंग्लंड भागातील समुद्री चोरांनी स्वत:चे सांकेतिक शब्द निर्माण करून त्याचा एक प्राथमिक संग्रह केला.. हा संग्रह म्हणजे इंग्रजीच्या जडणघडणीची सुरुवात मानावी लागेल. या चोरांचा दबदबा वाढून त्यांनी पहिली बायबल शिकवणारी इंग्रजी माध्यम शाळा इंग्लंडमध्ये इं १७१० मध्ये सुरु केली. १८६० नंतर इंग्लंडचे अधिकाधिक इंग्रजीकरण झाले, शिक्षणापासून दूर असलेली इंग्रजी शिक्षणाचे प्रमुख माध्यम बनली तेव्हापासून शिक्षणक्षेत्रात इंग्लंडची जी वाताहत सुरु झाली ती अट रसातळाला जाऊन पोचली आहे.
इंग्रजी माध्यमाचे हे संकट पुण्याने बराच काळ दूर ठेवले होते पण अनेक जणांनी अनेकदा खोट्या नाट्या अफवा पसरवल्याने पुण्यात देखील १९९० नंतर इंग्रजी माध्यम अशी पाटी लावलेल्या शाळा वाढू लागल्या, ज्यातील अनेक शाळा NON TEACHING EDUCATIONAL INSTITUTE या प्रतिष्ठेच्या पुरस्कारास पात्र आहेत. राज्यपातळीवरील कोणत्याही परीक्षेत १९९० पूर्वी पहिल्या शंभर यशस्वी उमेदवारांत ९० हून अधिक विद्यार्थी पुण्याचे असायचे. एकट्या पुण्याचेच विद्यार्थी राज्यातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा पुढे असणे ही अतिशय विषमतेची स्थिती होती. इंग्रजी माध्यमाचा जोर वाढल्यावर इंग्रजी माध्यम शाळांनी कौशल्याने आणि तडफदारपणे ही विषमतेची स्थिती बदलली. आता महाराष्ट्र राज्यपातळीवरील अनेक परीक्षांत यशस्वी झालेल्यां पहिल्या शंभर विद्यार्थ्यांत पुण्यातील एकही विद्यार्थी नसतो. १९९० पूर्वी शिक्षणाबाबत राज्यांत आणि देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुणे शहराची परिस्थिती इंग्रजी माध्यम शाळांनी कुशलतेने बदलून दाखवली आहे. इंग्रजी माध्यम शाळांची संख्या महाराष्ट्रात पुण्यात सर्वाधिक आहे आणि या शाळांच्या प्रभावी कामगिरीमुळे आता पुण्याने महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांत वरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
प्रवेश अर्ज मिळण्याच्या आदल्या रात्रभर जागून इंग्रजी माध्यम शाळेच्या प्रवेशद्वारावर उभे राहून अर्ज मिळवणे, कर्ज काढून शुल्क भरणे, मराठी बोलल्यास दंड, मारहाण अशा सर्व दिव्यातून पार पडल्यावर आपापल्या मुलामुलींना परीक्षेत कमी गुण, ११ वी च्या प्रवेशासाठी गुणवत्ता कमी पडल्याने मोठी देणगी देणे अशी अचाट दिव्ये करून कृतकृत्य झालेल्या अनेक पालकांनी पुण्याला वरून पहिल्या क्रमांकापासून वरून २९ व्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी आपले तन, मन, धन पणाला लावून अथक प्रयत्न केले म्हणूनच आज पुणे अशी जबरदस्त झेप घेऊ शकले आहे. सर्वोत्तम स्थितीतून २९ व्या क्रमाकावर येणे हे सहजासहजी शक्य नसते तरीही अशी झेप घेण्यासाठी पुणे शहरातील ज्या पालकांनी हातभार लावला त्यांचा एक सत्कार सोहोळा व्यायला हवा. राज्यातील ३५ जिल्ह्यात सध्या असलेल्या वरून २९ व्या क्रमांकावरून आणखी प्रगती करीत वरून ३५ वा क्रमांक गाठण्यासाठी नवतरुण पालकांनी आणखी काय काय प्रयत्न केले पाहिजेत, इंग्रजीच्या गुलामीचे नवनवे मार्ग कसे शोधता येईल याबाबत अशा जुन्या पिढीतील यशस्वी पालकांनी समाजाला मार्गदर्शन केले पाहिजे.
अशा सत्कारासाठी पात्र व्यक्तींची नावे कृपया मला कळवावीत, हे आवाहन ! - अनिल गोरे, मराठीकाका