Monday, August 3, 2015

सुलभ आणि आकलनाला सोपी मराठी भाषा,

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔸
सुलभ आणि आकलनाला सोपी मराठी भाषा,
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

बहुसंख्य मराठी शब्द त्यांच्या इंग्रजी प्रतिशब्दांपेक्षा छोटे असतात.

उदा:-

👉छेद - denominator,
👉अंश - numerator,
👉फलन - fertilisation,
👉वेग - velocity,
👉कलन - derivative,
👉कर्ण - diagonal,
👉वीज - electricity,
👉प्रशासन - administration, 
👉गणित - mathematics,
👉क्लिष्ट - complicated,
👉हात - hand,
👉प्रवास - travel,
👉घर - house,
👉परीघ - circumference,
👉श्री - shree,
👉गडहिंग्लज - gadahinglaj,
👉रेणू - molecule,
👉महाराष्ट्र - maharashatra,
👉एकदिश - unidirectional.

फारच थोडे मराठी शब्द त्यांच्या इंग्रजी प्रतिशब्दांपेक्षा मोठे आहेत.

उदा:

👉ओबडधोबड - rough,
👉कार्यक्रमपत्रिका - agenda
👉एकमेवाद्वितीय - unique.

९९ %   मराठी शब्दांना जितकी मराठी अक्षरे लागतात, त्यापेक्षा त्यांच्या इंग्रजी प्रतिशब्दांना दुप्पट ते पाचपट इंग्रजी अक्षरे लागतात.

ख) बहुसंख्य मराठी वाक्ये त्यांच्या इंग्रजी भाषांतरापेक्षा छोटी असतात.

१)'वस्तूवर बल लावल्याने वस्तू प्रवेगित होते’  हे ६ शब्द, १८ अक्षरी मराठी वाक्य इंग्रजीत ‘when a force is applied on a body, an acceleration is produced in that body' असे पंधरा शब्द-एकोणसाठ  अक्षरी होते. मराठीमुळे इथे  ६५%  अक्षरबचत होते.

२)'एका वर्तुळकंसात आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या त्या वर्तुळाच्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते' हे १४ शब्द ४४ अक्षरी प्रमेय इंग्रजीत 'the measure of an angle inscribed in an arc of a circle is half of the measure of the arc of that circle intercepted by that angle' सत्तावीस शब्द, १०४ अक्षरी होते. मराठीमुळे इथे ५३ % अक्षरबचत होते.

हे अपवाद नसून बहुतेक वाक्यात अशीच स्थिती आढळते. कोणत्याही इंग्रजी मजकुराचा  मराठी अनुवाद करून होणारी ४० % ते  ७० % बचत  स्वत: पडताळून बघा.
मराठीतून कमी वेळेत अभ्यास होऊन मुले उत्साही आणि आनंदी राहतात ...

अशा अनेक फायद्यांचा लाभ घेण्यासाठी आजच मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवण्याचा निर्णय घ्या ...

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

अधिक माहितीसाठी संपर्क साधा ...

✏मराठी काका - अनिल गोरे
📞९४२२००१६७१
📧 MarathiKaka@gmail.com

     🚩मराठी शाळांचे शिलेदार समूह🚩
🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀

मराठी : जगासाठी उपयुक्त भाषा

हिमालयात एका जातीचे हरीण राहते. त्याच्या बेंबीत सुगंधी कस्तुरी पाझरते.ज्या सुगंधी पदार्थाची निर्मिती आपण करतो, तो माणसांना मौल्यवान वाटतो, हे त्या हरीणांना माहित नसते. यासारखे लाखो प्राणी महाराष्ट्रातही आहेत. त्यांच्याकडे कस्तुरी नाही, पण एक समृद्ध, संपन्न भाषा या प्राण्यांना येते. त्या प्राण्यांना आपल्या भाषेचे (मराठीचे) महत्व आणि व्याप्ती माहीत नाही.  भारतातील ७०% , अफगाण, पाकिस्तानातील ४०% भागात  विविध ठिकाणी एकेकाळी राजे किंवा राजांचे मुख्य कारभारी तरी मराठी होते.  छ. शिवाजी महाराजांनी भारतातील पहिले रयतेचे राज्य उभारले. शेतसारा ठराविक प्रमाणात घेणे, सैनिक आणि  कर्मचाऱ्यांना नियमित  वेतन देणे, सैन्य हंगामी स्वरुपात ठेवणे, नियमबद्ध न्यायव्यवस्था, गनिमी कावा आणि पुढे जगभर वापरल्या गेलेल्या अनेक संकल्पना महाराजांनी प्रत्यक्षात आणल्या. महाराजांना आदर्श मानणाऱ्या मराठी भाषकांकडे या संकल्पना राबविण्याची क्षमता होती म्हणून वरील व्यापक भागात कोणी ना कोणी मराठी भाषक सत्ताधारी अथवा त्यांचे मुखत्यार होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवातही मराठी भाषक  तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी केली. टिळक, आगरकर यांच्याकडे नंतर या लढ्याचे नेतृत्व आले. वासुदेव बळवंत फडके, चापेकर यांच्यासारख्या मराठी भाषकांनी क्रांतीची ज्योत पेटवली. अस्पुश्यता निवारण, स्त्री-शिक्षण, जातीभेद निर्मुलन, हुंडाबंदी, विधवा विवाह या सुधारणा करण्यात मराठी लोक पुढे होते, आहेत.

स्वतंत्र भारतात सार्वजनिक वितरण, अधिकोष (बँक) सेवा, टपाल, रोजगार हमी, शिक्षण, संशोधन, उद्योग, संगणक, सामाजिक सुरक्षा, महिला सबलीकरण अशा सर्व क्षेत्रात  मराठी भाषक पुढे आहेत. धरण, सिंचन व्यवस्थापन, रस्ते, अत्याधुनिक संपर्क सेवा यातही मराठी भाषकांनी मुलभूत कार्य केले. मराठी भाषकांची महाराष्ट्र राज्य परिवहन ही जगातील सर्वात मोठी, कार्यक्षम प्रवासी सेवा आहे. व्यापक भौगोलिक भागात, मानवी उपयोगाच्या असंख्य क्षेत्रात  मराठीचा दीर्घकाळ आणि भरपूर वापर झाल्याने मराठी भाषा मानवी वापरासाठी खूप अनुकूल झाली आहे. मराठीच्या विविध बोली आणि रूपे विकसित झाली आहेत. १०० हून अधिक साहित्य प्रकार, २०० हून अधिक सादरीकरण कला मराठीच्या पंखाखाली नांदतात, त्यातील काही फक्त मराठीत असून इतर कोणत्याही भाषेत नाहीत.

भाषिक अभिव्यक्तीची इतकी स्वतंत्र साधने अन्य भाषेत नाहीत. मराठीतील वैशिष्ट्ये,  व्याकरण नियम, सोयी मानवी वापरास खूपच उपयुक्त आहेत. मराठी शब्द उच्चारानुसार लिहिता, लिहिल्यानुसार उच्चारता येतात. मूळ मराठी शब्द आणि वाक्यांत अक्षरे, जोडाक्षरे कमी असून त्यांचा उच्चार सोपा, तर उच्चाराला वेळही कमी लागतो. वेळ वाचविणे हा मराठीचा महत्वाचा गुण आहे. मराठीत शब्दाला जोडून प्रत्यय लावत असल्याने शब्दांचा क्रम मागेपुढे झाला तरी वाक्याचा अर्थ सहसा बदलत नाही. इतर असंख्य भाषांत शब्दक्रम किंचित बदलला की वाक्य चुकते. मराठीतून अतिशय सहज आणि वेगाने कोणतीही माहिती व्यक्त करता येते. देवनागरी लिपीत  सोळा स्वर व जोडाक्षर पद्धत असल्याने मराठी उच्चारांसाठी लाखो स्वतंत्र अक्षरचिन्हे आहेत. या गुणामुळे मराठी  लिखाण वेगाने करता येते.

वस्तू, भावना, संकल्पना, कार्यप्रणाली, कृति अशा बाबींसाठी त्या बाबीचा उगम, निर्मिती प्रक्रिया, उपयोग यांचा विचार करून मराठी भाषकांनी पूर्व परिचित शब्दांच्या आधारे नवे साधित मराठी शब्द निर्माण केले. थोड्या मूळ मराठी शब्दांवरून लाखो साधित मराठी शब्द निर्माण झाले. या गुणामुळे मराठी मजकूर वाचता, लिहिताना शब्दकोशांचे सहाय्य कमी लागते.   मराठी भाषकांपुढे नवीन बाब आली की ते त्यासाठी नवा साधित मराठी शब्द बनविण्याची धडपड  करतात. या गुणामुळे अवाढव्य शब्दसंग्रह सांभाळण्याची वेळ मराठी भाषकांवर येत नाही.  

या अनेकानेक गुणांमुळेच ज्ञानेश्वरांनी अमृताशी पैजा जिंकणारी असे मराठीचे वर्णन केले. अमृत  शब्दाचा एक अर्थ अ-मृत  (जीवंत) असाही आहे.  माणूसच नव्हे तर कोणत्याही जीवंत सजीवाला मराठी भाषा समजेल, आपली वाटेल असे ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असावे. या भाषेचा वापर करणारे लोक शिक्षण, उद्योग  व्यापार, साहित्य अशा सर्व क्षेत्रात यशस्वी होतात.शास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील  शिक्षण  मराठीतून उपलब्ध नसल्याने मराठीकडे आपले काहीसे दुर्लक्ष झाले, पण  या सर्व क्षेत्रातील शिक्षण मराठीतून   देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करीत आहे. जागतिक भाषा होण्यास पात्र असलेल्या मराठीच्या  गौरवासाठी शासनाने २७ फेब्रु.  मराठी भाषा गौरव दिन म्हणून ठरवला आहे. मराठीचा गौरव सदैव करण्याचा आपण  संकल्प आपण आज करू या !  

                                            मराठीकाका, अनिल गोरे.
अध्यक्ष, समर्थ मराठी संस्था, ७०५ बुधवार पेठ, पुणे ४११००२. संपर्क : ९४२२००१६७१   marathikaka@gmail.com

संकेतस्थळे :  www.samarthmarathi.com       www.marathibhasha.com